Sunday, 15 November 2020

वादळी पावसातील दोन कळ्यांचे धैर्य

जुलै २०२० चा पावसाच्या महिना होता. जगभरात आणि महानगरी मुंबईतही करोना चा टाळेबंदी-लोकडाऊन असूनही करोनाचा कहर दर दिवशी नवनवी उंची गाठत होता. चांगली बातमी तशी दुर्मिळच होती. पण पर्यावरण स्नेहींना टाळेबंदी मुळे कारखाने बंद असल्याने वातावरणातील चांगला बदल दिसत होता. अशा परिस्थितीत सर्व जगातील सर्व प्रकारचे करोना योद्धे (डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सरकार यंत्रणा, पोलीस दल, सफाई कर्मचारी व नियमांचे पालन करणारी जनता) यांना वंदन, अभिनंदन व धन्यवाद देत, मी दोन जुईच्या कळ्यांची गोष्ट मांडत आहे. मानवी मनाच्या विकासासाठी!!

मला फुलझाडे लावण्याची आवड असल्याने विविध  फुलझाडे घरात लावतो. काही महिन्यांपूर्वी जुईचे  आणले होते. त्याला हळू हळू छान फुलेही येऊ लागली होती. पण त्या रोपट्याला हळू हळू कीड लागली व टीकाही केल्या कमी होईना. फुले यायची हि कमी झाली, तरी माझे नियमित लक्ष होते. काही दिवसानंतर दोन छान नवीन छोट्या कळ्या   आल्या व त्यांच्या फांदीचे टोक उन्हासाठी खिडकीच्या ग्रीलच्या बाहेरही  जाऊ लागली, मी साहजिकच आनंदी होतो. 



पण पावसाने चांगलाच जोर धरला होता, तशी सरकार कडून अगोदर  घोषणाही झाली होती.  जरी मला पाऊस खूप आवडतो तरी मला आज काळजी वाटत होती ती, ग्रील बाहेर डोकावणाऱ्या माझ्या नाजुक छोट्या कळ्यांची. दिवसभर चांगल्याच पाऊस पडला, त्या कळ्या जबरदस्त पावसाचे तडाखे खात दिवसभर जीव संभाळून/धरून होत्या . पण रात्री पाऊस जोरदार वाढला, कळ्यांना खूप तडाखे बसत होते व मी ते कोणालाही न सांगता शांतपणे  पाहत होतो. मी त्यांना घरात नाही घेतले, कारण मला अपेक्षा होते कि निसर्ग-प्रकृती ने त्या कळयांना "बहुतेक" वादळी पावसापासुन जगण्याचे शिकवले असणार. मला त्या कळ्यांचे धैर्य किती आहे हे हि पाहायचे होते, आणि जोरदार रात्रीच्या पावसात मी अंदाज लावला कि, आज हि बहुतेक त्यांची शेवटची रात्र असणार. ताळेबंदीतील सुधारलेल्या पर्यावरणात पावसाचा तडाखा नेहमीपेक्षा जास्तच होता. मी दिवसभर पावसात राहून थकलेल्या त्या कळयांना अभिनंदन व शुभेच्छांसह शेवटचा निरोपही देऊन निराश होऊन झोपून गेलो. 



    सकाळी उठलो आणि पहिला कळयांना पाहायला गेलो, हलका पाऊसही पडत होता आणि कळयाही डोलत होत्या. मला खूप आनंद झाला, कारण माझा अंदाज चुकला होता. त्या कळयांना अजूनही धैर्य होते. मी कोणासही काहीच बोललो नाही दुसराही दिवस आणि रात्र तशीच वादळाची होती. साधारणतः तिसऱ्या दिवशी जुईच्या काळ्या फुलल्या, मी तर खुपच खुश होतो. माझा आनंद परिवाराला  सांगितला. 



नंतरचे दोन दिवस त्या कळ्या  सुंदर सुवासिक फुल झाल्या. समाधानाने हसत त्यांनी खूप सुगंध दिला व प्रसन्नता हि दिली. साधारण तिसऱ्या दिवशी, त्यांच्या पाकळ्यांतील गंध आणि सौन्दर्य कमी झाले. आणखीन २-३ दिवसांनी त्यांना धरणीने कुशीत घेतले, कळ्यांचे कठीण जीवन पुर्ण झाले. त्या कल्याणी माझ्या मनात घर केले होते, आणि त्या झाडाकडे पाहताना मला त्या कल्यानेहमी आठवायचा.  नवीन १- २ आठवडे काही नवीन कळ्या आल्या, त्यांचीच आठवण घेऊन तेव्हा मात्र वादळी पाऊस नव्हता. पण नंतर मात्र एकही कळी  नाही आली. त्या झाडाला खूपच कीड लागली होती, मी अनेक वेळा नवनवीन उपाय योजुनही लाभ नाही झाला. माझ्या मनात अजूनही त्या वादळी पावसातील त्या दोन कळ्यांचा गंध  होता. आणि त्या गंधापेक्षा जास्त त्यांचे परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि थोड्याश्या आयुष्यातही त्यांचे हसरे चित्र (ज्याने मला निर्वाणाचा नवा आयाम दाखविला) . 
 



नंतर कळत-नकळत तीन महिन्यानंतर माझ्या स्वतःच्या मनालाही खूप कीड लागली. मी  खूप उदास झालो, आसपासची आर्थिक  व सामाजिक परिस्थिती, कामगार-मजुरांचे हाल, खाजगी-सरकारी बंद होणाऱ्या नोकऱ्यांची बातमी; मी वास्तविक खूप व्यथित झालो. जणु काही उदासीन घटनांची मालिकाच समोर आली. माझा परीने  मी काही समाजाच्या घटकांना व सरकारला जरी अर्थसाहाय्य केले आणि जमेल तसे(अनियमित) ध्यान करत मंगल मैत्री हि दिली, तरी माझे मन खूप विषान्न व बैचेन झाले होते. वाटत होते कि मि  भारताचा  सुशिक्षित-सुस्थापित नागरिक म्हणून खूप कमी पडत आहे.  


मला एकुण भारतीय समाजाच्या विविध गरीब, दुर्लक्षित असहाय्य्य, असुक्षित व असंघटित वर्गाच्या भवितव्याने अस्वस्थ झालो. कुठेही काही अशी बातमी दिसत नव्हती कि ज्याने हा वर्ग स्वावलंबी बनेल किंवा त्यांची येणारी पिढीला किमान शिक्षण-आरोग्य-नोकरीच्या सेवा कशी मिळेल हे काही कळत नव्हतं. काही लोकां-मित्रांकडे मी बोलूनही दाखवले, पण ना उपाय मिळाला ना धैर्य  ना आशा!!  तिघांपैकी काहीतरी एक तरी मिळायला हवे होते. 


तेव्हा आदरणीय मेत्ताधम्मो भंतेजींशी बोलताना  मला स्वतःला आठवण आली ती ह्या  जुलै महिन्यातील दोन कळ्यांची!! मी त्यां कळ्यांची सगळी परिस्थिती आठवली. त्यातून मला धैर्य व आशा हि मिळाली जी ह्या समाजाच्या विविध गरीब, दुर्लक्षित असहाय्य्य, असुक्षित व असंघटित वर्गालाच नाही तर कुठल्याही  दुःखी -उदास मनाला प्रेरणा देईल; जशी मला मिळाली. 


काही कळालेली तत्वे आणि कळ्यांचे वास्तव (मानवाच्या समस्येवरील उपायांसाठी)  मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे :
१. आता संकट जीवघेणे आहे आणि अपेक्षित काम होणार नाही असे जेव्हा वाटते, तेव्हा तसे  होईलच असे जरुरीचे नाही.त्या दोन जुईच्या कोमल कळ्यांनी वादळी पावसात मनाला नियंत्रित/प्रशांत करीत धैर्याचे व धाडसाचे दर्शन घडविले होते.  ( क्षांती   पारमिता ).  
२. जेव्हा असे वाटते कि, "हे मला शक्य होणार नाही, मीही कधी हि केलेले नाही. मला जमणारच नाही!", तेव्हा अपयशाशिवाय मला काही मिळुच शकत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. त्या दोन नाजुक जुईच्या कळ्यांना  कसलाच  अनुभव नसतानाही वादळी पाऊस सहन केला होता, निसर्गाला/रोपट्याला अपेक्षित यश संपादन केले होते.  ( अधिष्ठान पारमिता )
३. आपल्यातील ताकत ही  तेवढीच असते जेवढी आपण ती आपल्या सत्कर्म व धैर्याद्वारे कमावतो. त्या दोन नाजुक जुईच्या कळ्यांनी आपल्या प्रगतीसाठी स्वतःची  क्षमता वाढवत(वीर्य पारमिता ) उन्हात राहून टाकत कमविली होती. तसेच रोपट्याचा उंच शेंड्याला जरी पोचले तरी, मातीतुन क्षार मिळवण्याचे कष्ट करणारी मुळे व स्वतःचे वजन पेलणाऱ्या स्वतःच्या पुर्वजांचे आभार व संलग्नता (नाते ) सोडले नाही (उपेक्षा पारमिता ). जरी त्या कळ्या खूप उंचीवर पोहोचल्या तरी, आपले समाजबांधव (पाने, खोड  व कधीही न दिसणारी मुळे) यांना आपल्या मिळकतीचा वाट (निष्क्रमण: बाहेर पडत उन्हात राहुन सूर्याकडून मिळालेली शक्ती) अखंडींतपणे पोहोचवली(मैत्री  व दान पारमिता ).   
४. नशिबाला न जुमानता आसपासच्या वाईट/विपरीत परिस्थितीतही तुम्ही दिव्य काम करू शकता. त्या दोन नाजुक जुईच्या कळ्यांनी हे दाखुवुन दिले कि जरी बहुतेक झाडाला जरी कीड लागली असली तरी, तुम्ही स्वतःला स्व-शुद्धी प्रक्रियेनुसार निरोगी ठेवून अशक्य असे काम करू शकता ( शील  पारमिता ).
५. परिस्थिती समोर हार मानण्यापुर्वी जो जो क्षण येईल, त्या त्या क्षणाला विचारपूर्वक व अनित्यबोध जागवत आहे तेवढे जीवन सुखी करू शकता. त्या दोन नाजुक जुईच्या कळ्यांना याची कल्पना नव्हती कि पाऊस त्यांना जगू देईल कि नाही, त्यांना फुलात येईल कि नाही, अजून किती वेळ कठीण काळ आहे कि नाही. त्यांनी याचे उदाहरण दिले कि, कुठलीही परिस्थिती कायम राहत नाही, बदलत असते. पाऊसही नेहमी(दर क्षणाला)  पडणार नाही. त्यांनी हे शिकले कि दर ५-१० सेकंदानंतरच पावसाच्या थेंबाचा तडाखा बसतो, तेवढ्यात मी आणखीन संयम व धैर्य कमविन. अनित्यबोध परिस्थितीद्वारे प्रत्येक क्षणी सजग राहत  समजुन घेईल( प्रज्ञा   पारमिता  तसेच आतापी - स्मृतिमान-संप्रज्ञानी  हा बुद्धांचा निर्वाणप्राप्तीचा  फॉर्मुला!!).
६. जर माझ्या कुटुंबाला/समाजाला कीड लागलेली असताना, मी माझ्याद्वारे माझ्या रोपट्याची/समाजाची उपयोगिता जसे सुवास/प्रसन्नता/चारित्र्य दाखवु शकलो  तरच माझे  रोपट्याचे/समाजाच्या प्रति कर्तव्य/ऋण  फेडु शकेन.  त्या दोन नाजुक जुईच्या कळ्यांना याची कल्पना होती कि, जर रोपट्याला कीड लागली व त्याला आता पूर्वीसारखी फुले येत नाही तर अशा रोपट्याचे जीवन संकटात येते. त्यामुळे त्याने रोपट्याची गुणवत्ता/उपयोगिता सिद्ध करण्यासाठी व आपल्या इतर समाजबांधवांवरील(पाने, खोड  व कधीही न दिसणारी मुळे)  संकट टाळण्यासाठी वादळाशी दोन हात करत  रोपट्याची गुणवत्ता/उपयोगिता सिद्ध करीत जमेल तेवढे करून दाखविले. रोपट्याची गुणवत्ता खरी ठरविली ( प्रज्ञा, दान, करुणा, वीर्य, अधिष्ठान, सत्य, निष्क्रमण  पारमिता )

७. जरी आज यश दिसले व सुबत्ता, सौन्दर्य व यौवन असले, तरी आपल्या यशातील वाटेकरी इतर समाजबांधव (पाने, खोड  व कधीही न दिसणारी मुळे)  यांना विसरून अभिमानाने आंधळे होऊ नये. कारण जसा पाऊस अनित्य होता, तसे सोंदर्य-यौवनही अनित्य/नश्वर/क्षणभंगुर आहे. विनम्रता व समाधानाच आनंद चेहऱ्यावर नेहमी ठेवावा.  त्या दोन नाजुक जुईच्या कळ्यांचे आयुष्य २-३ दिवसांचे मर्यादित होते. पण विनम्रता, कृतज्ञता, निरागसता (एकूणच मनाची शुद्धता)  व समाधानाच्या आनंदाचा गोडवा त्यांच्या  चेहऱ्यावर नेहमी आपोआप(प्रकृतीद्वारे) राहिला . फुल बनल्यावर तिसऱ्या दिवशी कोमलता, सौदर्य व सुवासिकता हळू -हळू सोडून गेली. पण ना हिरमोड झाला, ना वैषम्य आले आणि ना वैफल्यग्रस्तपणा  आला. मातीच्या कुशीत झोपताना, खूप सुख-खूप समाधान-खूप सफलता मिळाली. ती मृत्यु च्या वेळी त्यालाच मिळते ज्याला निर्वाण प्राप्त होते.  

८. जरी जीवन संपले तरी, सद्गुणी, मेहेनती, परोपकारी जीवन अनेकांना सध्दर्माची व उंच्चतम गुणवत्तेची(मानवी मूल्यांची)  प्रेरणा देते. त्या दोन नाजुक जुईच्या कळ्यांचे आयुष्य संपले व ४-५ दिवसानंतर नवीन एकही कळी आलेली नाही. पण त्या दोन मुलींनी/कळ्यांनी मला आजही प्रेरणा दिली(करोना नंतरच्या आर्थिक/सामाजिक स्थितीशी झुंजण्याची  व त्या सुवासिक जुईच्या रोपंटच्या गुणवत्तेची हमी/खात्री दिली( करुणा  पारमिता  . ती खात्री/विश्वास एवढा आहे, कि आज ४ महिन्यानंतरही एकहि कळी आलेली नसतानाही मी त्या झाडाला वाऱ्यावर सोडले नाही. नेहमी काळजी घेत आहे. ही आशा व विश्वास आहे, कि त्या दोन नाजूक जुईच्या कळ्यांसारखी झुंजार, लढाऊ, परिवाराशी संलग्न राहून काळजी घेणारी, सद्गुणी, चारित्र्यवान व सुंदर फुले येतील. भले आज नाही तर उद्या अवश्य येतील. कारण ते रोपटे अजून जीवंत  आहे, त्याची हिरवी पाने, निब्बर/(जे दिसायला सुंदर नाही)  खोड  व जमिनीखालील मुळे (जी फुलांसारखी सुंदर नाहीत) अजून मेहनत करीत आहेत, व आशावादी आहेत. एक दिवस प्रकृती/निसर्ग साथ देईन. ती किंवा त्याच्यासारखी धैर्यवान, सुवासिक अशी गुणवत्ता असलेली फुले येतील. 
८. जमेल तेवढे, जमेल तसे आणि जमेल तेव्हा धैर्यपुर्वक, निस्वार्थ  आणि सुयोग्य कामे करीत राहा.  कोण जाणे तुमचे  आशावादी, निर्दोष  आणि  निरोगी जीवन इतरांना जगण्याची नवी दिशा देईन. त्या दोन नाजुक जुईच्या कळ्यांचे आयुष्य संपले जे आशावादी, निर्दोष  आणि  निरोगी जीवन होते. त्या जीवनाने इतर कळ्यांना नवी उमेद दिली. मलाही शिकविले कि , कण्हत /कुढत/नाराज होत जगण्यापेक्षा काय करता येईल तेवढे पहा आणि करा. आपण वादळ किंवा पाऊस रोखु शकत नाही, पण आपल्याकडे असणारी सुविद्या, जिद्द, आशावाद आणि निर्दोष जीवन जगुन जीवनात 

त्या दोन नाजूक पण "कल्याणी" कळ्यांनी मला प्रचुर प्रेरणा व आशा  दिली. त्या दोन कळ्यांची जीवनकहाणी पाहता आसपासची आर्थिक  व सामाजिक परिस्थिती, कामगार-मजुरांचे हाल, खाजगी-सरकारी बंद होणाऱ्या नोकऱ्यांची बातमी अशा अनेक समस्यांवर सध्दर्माच्या मार्गदर्शनाने ( दहा   पारमिता  किंवा एकूण ३७ बोधिपक्षीय धर्म ) गोरगरीब-शोषित-(पुढारी नसल्याने ) अनाथ समाजघटक पुन्हा आशा  व धैर्य वाढवीत त्यांचे व त्यांच्या पुढील पिढीचे जीवन सुखी-शांतीपूर्ण-समाधानी करू शकतील. 

अनेक वादळे-संकटे-कीड येवोत, जोपर्यंत अशी फुले/कळ्या छोट्याश्या जीवनातही सहजता व सफलता दाखवतील, ते बळ देतील इतर कळ्यांना (सुस्थापित वर्ग ) समाजबांधवांना (  (पाने, खोड  व कधीही न दिसणारी मुळे म्हणजे  अप्रगत/विस्थापित  सामाजिक वर्ग ) !! )  विजय होवो त्या धैर्याचा, संयमाचा, समाजाच्या प्रति कृतज्ञतेचा, परहितबुद्धीचा व आंतरिक शुद्धीचा !! हाच आहे आशेचा किरण, कठीण दिवसात. 

भले होवो  त्या कळ्यांचे व त्याच्या स्वहीतबुद्धीचे तसेच परहितबुद्धीचे !!

संबोधन धम्मपथी 
मोबाईल: ९७७३१००८८६





 






Sunday, 30 August 2020

बुद्ध प्रमुख संघातील धुतांगधारी मध्ये अग्र महाकाश्यप



महाश्रावक अग्र धुतांगधारी (नितांत परिशुद्धी साठी सन्याशाचे व निर्वाणाचे तंतोतंत व कडक नियम पाळणारे) महाकाश्यप 

धुतांग : आपल्या प्रतिपक्षातील/दुष्मनातील सर्वाना धुणे/आघात करणे तसेच प्रतिपत्ति चे अंग असल्याने धुत + अंग  = धुतांग 


महाकाश्यपांना का स्मरावे :
१. एकमेव भिक्षु ज्यांचे चीवर तथागतांनी घेतले व त्याला आपले चीवर दिले 
२. भगवंतानी ज्यांना ध्यान-अभिज्ञा साठी स्वतःच्या क्षमतेचे घोषित केले 
३. ज्यांनी दूरदर्शिता ठेवत पहिली संगायन भरावयाची ठरविली, व सद्धम्म आपल्यापर्यंत सुरक्षित ठेवण्याची पद्धत (संगायन) राबविली
४. ज्यांच्या आल्यानंतरच भगवंताची चिता आपोआप पेटली 
५. सर्व विनयपिटकातील नियमांचे तंतोतंत आणि गंभीरतेने पालन करणारे 
६. भोजनदानाचे निमंत्रण कधीही न स्वीकारणारे (फक्त भिक्षे साठी याचना करत जगणारे)


७. जंगलात, डोंगरदरीत  व स्मशानात राहणारे 
८. अशा सात व्यक्तींपैकी एक ज्यांच्यासाठी भगवंतांनी ३-३. किलोमीटर ची तुरित चारिका (त्वरित ऋद्धी वापरून दर्शन दिले )
९. असा एकमेव भिक्षु ज्याने कुष्ठरोग्याने दान देताना सडलेले बोट भिक्षापात्रात पडले तर ते, दिलेले दान सन्मानाने स्वीकारावे अशा नियमाचे तंतोतंत पालन करत खाल्ले



(फोटो फक्त मेहनतीची कल्पना यावीम्हणून आहे )



जे भिक्षु खालील नियमांचे नियमित पालन करतात ते धुतांगधारी (परिशुद्ध स्थिती ) बनतात (संदर्भ: विशुद्धीमग्ग ४४३)

१. फाटक्या कपड्यांचे चीवरओढतात. 
२. फक्त तिचं चीवर धारण करतात 
३. फक्त भिक्षान्नच घेतात, (घरी जेवायला जात नाही )
४. एका घरातून दुसऱ्याघराकडे भिक्षा घेतात. कोणत्याही घराला वगळत नाही. 
५. दिवसातून एकदाच जेवतात 
६. जेवढे जेवण भिक्षापात्रात येते तेवढेच जेवतात, पुन्हा घेत नाहीत किंवा मागत हि नाही. 
७. एकदा का भिजणं झाले कि पुन्हा भोजन घेत नाही 
८. निर्मनुष्य जंगलात (एकांतवासात) राहतात . 
९. झाडाखाली राहतात, एखाद्या झोपडी किंवा विहारात नाही. 
१०. मोकळ्या आकाशाखाली राहतात. 
११. श्मशानात राहतात 
१२. जे जसे भेटेल त्या विना तक्रार करता समाधानाने जागी राहतात. 
१३. शय्येला त्यागून फक्त बसून राहतात. 



हे सर्व सद्गुण व त्याग कशासाठी आहेत ?
हे आहेत अल्प ईच्छा, संतुष्ठी ठेवत तसेच जे काही दान मिळाले ते देणाऱ्याबाबत कृतज्ञतेची भावना ठेवत माणूस परमसुख व अंतिम सत्यपर्यंत पोहोचू शकतो हे त्यावेळच्या व भविष्यातील संघाला (भिक्षु-भिक्षुणी व उपासक-उपासिका) यांच्यापर्यंत बुद्धाचे नियम व शिक्षा पोहोचवावी यासाठी महाकाश्यप खुप सतर्क व प्रयत्नशील होते.



निर्वाणासाठी महत्वाचे मार्गदर्शन (थोडक्यात):
१. भिक्षु ने (साधकाने) एकांतवासी असावे. नाहीतर मन भटकण्यासाठी चारी बाजूने आलंबने मिळतील. मग एकाग्रता, समाधी दुर्लभ होईल, नंतर खूप दुःख होईल. 
२. संग्रह करण्याची प्रवृत्ती दुःख, व्याकुळता आणि विकारांचे संवर्धन करील. भोग-विकासाच्या ठिकाणी (मॉल्स, सिनेमा, नाटकगृहे, हॉटेलं, बाजारहाट)  हि जाऊ नका. परम सुख निर्वाणाला असे करणे बाधक होईल. 
३. स्वतःचा सत्कार-पूजन करवून घेण्याच्या वृत्तीपासून दूर राहा. ते केल्याने मी-माझे असा प्रपंच वाढत जातो. 
४. चीवर, जेवण व निवासाबाबत कुठलीही निवड किंवा  ईच्छा दाखवू नका.
५.सर्व प्रकारच्या वाद्य-संगीताच्या आकर्षणापासुन अलिप्त राहत स्वतःला सम्यक विपश्यनेत प्रतिष्ठापित करा.
६.भिक्षु(साधक) सदा अडोल(सुखू-दुःख, यश-अपयश, फायदा-तोटा, निंदा-स्तुती ने न विचलित होता) मनाने समतावान व प्रज्ञावान आणून राहावे.
७. काही प्रश्न अव्याकृत आहेत व ते तसेच ठेवावे. कारण ते परमार्थासाठी नाहीत, ब्रह्मचर्या(सद्धर्म धारण)साठी नाहीत, निर्वेदासाठी नाहीत, विरागासाठी नाहीत, निराधासाठी नाहीत, शांतीसाठी नाहीत, ज्ञानासाठी नाहीत, संबोधीसाठी नाहीत, आणि निर्वाणासाठी हि नाहीत. (अव्याकृत प्रश्न जसे: का जीव मृत्यु नंतर राहतो का? व्याकृत प्रश्न जसे : दुःख म्हणजे काय, ते कसे होते व कसे दूर करावे?)



महाकाश्यपांचा शेवटच्या जन्मातील इतर महत्वाच्या घटना :
१. महातीर्थ गाव (मगध राष्ट्र ) कपिल नावाच्या ब्राह्मणाच्या घरी जन्म
२. ८७ करोड संपत्ती, १४ गावे , यंत्र लावलेले ६० तलाव, ६०० किमी पसरलेल्या व्यापाराचा मालक 
३. लग्नासाठी अजिबात तयार नाही 
४. काल्पनिक पद्धतीने पण असंभव अशी सुंदर स्रीची सोन्याची मुर्ती बनवून, जर अशी स्त्री मिळाली  तरच विवाह 
५. भद्दा कपिलानी अशी स्री भेटली व मर्जी नसताना लग्न करावे लागले 
६. प्रासंगिक पुण्य स्मृती झाली व पती पत्नी ने गृहत्याग केला 
७. भगवंतानी चिवरचे आदान-प्रदान केले. 
८. चोर बनलेल्या शिष्याला जुने कर्मस्थान देऊन धैर्य दिले. तिथेच त्या शिष्याला  अर्हतपद मिळाले. 
९. सारीपुत्तांना दोन वेळा प्रश्नांना उत्तर दिले. 


संदर्भ: महाकस्सप, भगवान बुद्ध के महाश्रावक (विपश्यना विशोधन विन्यास)


Sunday, 5 July 2020

उपोसथ परंपरेचा इतिहास व महत्व

वाचकहो,  बुद्धानुयायी लोकांमध्ये उपोसथ या परंपरेचे खूप आहे. चला, आज उपोसथबद्दल काही माहिती पाहूया !!
खात्रीलायक माहितीसाठी संदर्भ हे लेखाखाली दिलेले आहेत.  

उपोसथाचा इतिहास : 
पोसथ या शब्दाशी मिळताजुळता अथवा जोडलेला शब्द आहे, उपोसथ . पोसथ या शब्दाचा अर्थ आहे, उपवास करणे -उपाशी राहणे!! पण बुद्धवाणीत  उपोसथ या शब्दाचा अर्थ आहे, 'मुळ/गर्भित  अर्थाचे स्पष्टीकरण करणे".  कोणाद्वारे?   स्थानीय भिक्षूंची निर्वाणप्राप्तीच्या नियमांविषयी छोटी परिषदे द्वारे !

ह्या प्रथेचे दोन प्रमुख उद्देश्य आहेत, 
१. बुद्धांच्या संघातील भिक्षुंचे संबंध स्नेहाचे व मजबूत व्हावे (संदर्भ १)
२. "दुषित मनाची विशुद्धी"(संदर्भ १,४)  !! बुद्धकालीन राजा बिंबिसार यांच्यामुळे ती प्रथा सुरु झाली (संदर्भ-१). तसेच मगरमाता विशाखेलाही भगवंतांनी उपोसथ चांगल्याप्रकारे समजावून सांगितलेला आहे. (संदर्भ-४).

साधारणतः दोन आठवड्यातून भिक्षुंच्या द्वारे भिक्षुंच्यासाठी सद्धर्माविषयी, विनय नियमांविषयी आणि प्रतिमोक्षाच्या (निर्वाणप्राप्तीच्या २२७ नियमांची संक्षिप्त आवृत्ती ) बाबतीत घेण्यात येणारी जाहीर स्थानीय सभा. जेणेकरून बुद्ध वाणी विषयी उजळणी तसेच शंकांचे निरसन करता येईल. (संदर्भ-१). उपोसथच्या अंमलबजावणीच्या परिषदेसाठी चार भिक्षु व परिशुद्धी(संदर्भ-३)च्या परिषदेसाठी किमान दोन भिक्षु वैयक्तिक रित्या उपस्थित राहणे आवश्यक होते. जर चार नसतील तर किमान दोन तरी असावेत. (संदर्भ-२)

त्यावेळी उपोसथ पूर्ण करण्यासाठी एक मर्यादित व ठराविक सीमा ठरवली जात असे. जसे जागेच्या सीमेसाठी एखादी टेकडी, लाकुडाची खूण-झाड, नदी अथवा वारुळ! अशा प्रतिकांद्वारे ओळखली जाणारी ठराविक जागा. जर तशी  प्रतीकानी ओळखता येणारी ठराविक जागा  नसेल तर त्याच गावात जिथे भिक्षु निवास करतात ती मर्यादित जागा ठरवली जायची. (संदर्भ-१)

भगवंतांनी उपोसथात काय सांगितलेले आहे :

त्रिपिटकातिल अंगुत्तर निकायात (०३.०७०) मुलोपोसथ (मुळ-उपोसथ) सुत्त आहे!! त्यात भगवंतांनी मिगारमाता  विशाखेला उपोसथ करण्याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले आहे. त्यात भगवंतांनी सांगितले कि उपोसथ किती प्रकारचे असतात व श्रेष्ठ उपोसथ त्यालाच  म्हणावे ज्याने, मनुष्याच्या मनातील अशुद्धता नष्ट होते व निर्वाणाच्या पथावर प्रगती होते.  त्यासाठी एक वेगळा लेख लिहिणार आहे. तोवर ह्या ठिकाणाचा इंग्लिश लेख वाचावा. 


आधुनिक काळातील उपोसथ :

योजना :
  • आजच्या काळात गृहस्थ व भिक्षु संघ दोघेही सद्धर्माबाबत जागरूक व सजग राहून मनातील विकार (आसक्ती-द्वेष-मोह जसे कामवासना, अहंकार, तिरस्कार, ईर्षा-मत्सर, भीती, चिंता पश्चाताप, बैचेनी ) दूर करण्यासाठी सामुहिक  ध्यान, वाचन व धम्म चर्चा करत मनःशुद्धी करतात. एकमेकांना धम्मात प्रवीण होण्यासाठी प्रेरणा देतात. 
  • उपोसथाचा दिवस हा  पौर्णिमा,अमावस्या, कृष्ण अष्टमी , शुक्ल अष्टमी या  दिवशी योग्य ठिकाणी भेटून धम्मात विकास करण्यासाठी साजरा करतात. कारण उपासक-उपासकांना कौटुंबिक कामामुळे धम्म व्यवस्थित व नियमित शिकण्यास कठीण जाते. कारण ते  भिक्षु -भिक्षुणी सारखे पूर्ण वेळ विपश्यना साधना किंवा धम्म अभ्यासात वेळ  देऊ शकत नाही.
  • त्यामळे आठवाड्यातील किमान एक तरी दिवस जो  पौर्णिमा,अमावस्या, कृष्ण अष्टमी , शुक्ल अष्टमी या  दिवशी येतो त्या दिवशी गंभीर साधना करावी,  भिक्षु -भिक्षुणी किंवा वरिष्ठ गुरु बंधू सोबत धम्म चर्चा करावी व एखाद्या  भिक्षु -भिक्षुणी सारखे आयुष्य जगावे अशी अपेक्षा आहे. 
  • काही जण तर अधिक काळ जवळच्या बुद्धविहारात धम्म ज्ञान/प्रवचन मिळवत व धम्म चर्चा करत पूर्ण करतात.  उपासक-उपासकां उपोसथाच्या दिवशी अधिक सजग व जागृत राहून पूर्ण दिवस धम्म अभ्यास करीत, धम्म प्रवचन ग्रहण करीत, धम्म चर्चा करत असतात, त्यांच्या क्षमतेनुसार. 
  • जर आसपास भिक्षु असल्यास, उपोसथाच्या दिवशी भिक्षुला भोजनदान दिल्याशिवाय उपासक /उपासिका भोजन करीत नाही . पूर्ण आठ शील त्या एका दिवस व रात्री साठी ग्रहण करण्याची शपथ घेतात
उपोसथाचे अपेक्षित परिणाम :
भिक्षु-भिक्षुणी सारखे  आयुष्य जगावे अशी अपेक्षा का आहे?
व्यक्ती आयुष्य  जगताना बऱ्याच वेळा आठ लोकधर्मांचा (सुख-दुःख, फायदा-तोटा, निंदा-स्तुती, यश-अपयश) विपरीत परिणाम होऊन दुखी होतो. ऐनवेळी परिस्थितीला सामोरे कसे जायचे याचे उत्तर नसल्याने स्वतः दुखी-बैचेन होतो व परिवारासह सर्व आप्त-स्वकीयांना दुःखी-बैचेन करून टाकतो. त्यामुळे मानवी मनाचा हा नित्य स्वभाव ओळखून त्यावर योग्य व स्थायी (पर्मनंट ) औषध शोधणे हे शहाण्या माणसाचे लक्षण आहे. 


जीवन हे तर १)अनित्य (नेहमी बदलते ), २) अनात्म (माझी मालकी असलेले (कर्म सोडून) काहीच नाही व ३)दुःख (जन्म- मृत्यू, प्रिय/ घटनेचा व्यक्तीचा वियोग , अप्रिय व्यक्ती/घटनेचा संयोग , आजारपण , गरिबी , अनिश्चितता, अनपेक्षित अपयश/तोटा/अपमान ) याने भरलेले असल्यमुळे धम्मा  शिवाय दुःखमुक्तीचा मार्ग नाही हे अनुभवाने शिकण्यासाठी भिक्षु-भिक्षुणी सारखे (म्हणजे सुखसोयींचा व नातलगांच्या अभाव असणारे पण मनाच्या  चंचलतेला/बेधुंदीला नियंत्रित करणारे) आयुष्य जगत असताना  मी पणा व इतर भ्रमातून मुक्ती मिळवणे अपेक्षित आहे. 


आदर्श व जबाबदार भिक्षु हे नेहमी अष्टशील पालन करणारे, ध्यानमार्गी  व एकासनी (दिवसातुन एक वेळच जेवणारे ) असे असतात. त्यामुळे साधारण उपासकाला नेहमीच्या पंचशीलांसोबत बाकीचे तीन शील (खाली दिल्याप्रमाणे)असे एकूण आठ शील धारण करावे लागतात. असे भिक्षु (अथवा धम्मप्रगत उपासक-उपसिका)   अध्यात्मिक/पारलौकिक शांतीचे उदाहरण बनून, अन्य उपासक-उपसिकांना धर्मात प्रवीण होऊन जीवनात सुखी होण्याची नवीन  ऊर्जा देतात


नवीन तीन शिलांचे फायदे :
१) एकदाच व दुपारी १२ च्या आत जेवींन (विकाल भोजना वेरमणी )  (एकाच वेळेला जेवल्याने आळस दूर होऊन उत्साही पद्धतीने ध्यान करता येते, व शरीर स्थूल होत नाही. जेवणात संयम बाळगणे शक्य होते. )
२) संगीत, नाच-गाणे, नाटक-कला (स्पर्धा-खेळ) पाहणे , सुगंधी द्रव्ये-पुष्पमाला, सौन्दर्य प्रसाधने, दागदागिने वापरणार नाही.  (जे शरीराचे अनित्यबोधी गुणधर्म लपवण्यासाठी व पैसा-पाणी-संपत्ती मिरवण्यासाठी वापरले जातात तसेच विषयवासना, अनैतिक संबंध व जीवनातील महत्वाच्या प्रश्नांपासून तात्पुरता विरंगुळा/मनोरंजन/कल्पनाविलास  मिळवण्यासाठी पाहिले जातात  )
३)  उंच शय्या/महाशय्या  (शयनासन ) वापरणार नाही. ( साधे जीवन जगण्याची प्रेरणा, ऐहिक सुखांच्या शिवाय पारलौकिक सुखाचा अनुभव, साधेपणातून मिळणारा अध्यात्मिक आनंद मिळवण्यासाठी उपयोग होतो)

तीन प्रकारचे उपोसथ:
उपोसथच्या ध्येयानुसार तथागतांनी तीन प्रकारचे उपोसथसांगितले आहेत. 
१) गोपालक उपोसथ: गोपालकाचे असे नियोजन असते आज गायी-गुरांनी अमुक चारा अमुक ठिकाणी खाल्ला आहे; उद्या तमुक ठिकाणी तमुक प्रकारचा चारा खायला देऊया . त्याच प्रकारे असे उपोसथ पाळणारे असतात आज माझा उपवास आहे व आज अमुक दिन आहे म्हणून, मी आज अमुक प्रकारचे भोजन करणार (व स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेणार )  

२) निर्ग्रंथ-जैन लोकांचा उपोसथ : (मी भाषांतर करणारा लेखक धम्मपथी,  जैन लोकांप्रती आदरासहित एका इंग्लिश वेबसाईट वरील मसुदा मांडत आहे) निर्ग्रंथ म्हणतात कि, "हे गृहस्थानो दंड देणे सोडा! चारही दिशेतील १०० वर्षे जगणाऱ्या व्यक्तींसाठी दयाबुद्धी व करुणा  दाखवा" पण त्यांची करुणा व दयाबुध्दी हि सर्वव्यापी/सर्वासाठी नसते. तसेच ते म्हणतात, "गृहस्थानो, अंगावरील  वस्त्रे सोडून द्या! आता बघा इथे असे काहीच नाही जे कोणाचे आहे व माझे असे काहीच नाही. (कारण मी सर्व  सोडलेले आहे, कपडे ही !)" तरीही मी  कोण, माझे पालक-नातेवाईक कोण, माझी पत्नी-मुले, माझे सेवक-दास अमुक असे सर्व ते लक्षात ठेवतात!! तसेच त्यांचे पालक, सेवक-दास  व नातेवाईकही असे त्यांच्याबद्दल लक्षात ठेवतात! अशा प्रकारे ते सत्याकडे  मन वळवण्याचा प्रयत्न करतात, पण ते भ्रमाकडे मन वळवितात. तसेच रात्री अशा वस्तूंचा उपभोग घेतात, जे त्यांना  दिलेले नसतात.  तथागत म्हणता, कि हा चोरीचा प्रकार आहे.

३) आर्य (महान) उपोसथ : जेव्हा लोक जीवन्मुक्त-अरिहंत संबुद्धाचे शब्द आठवून मन उल्हसित करतात व विकारांना ओळखतात तेव्हा ते मनाच्या शुद्धीबाबत प्रेरित होतात. पहिले अंग धर्माचे शील पालन करीत विविध  दुष्कर्माबाबत अधिक माहिती घेत दुष्कर्मांपासुन अलिप्त राहतात. दुसरे अंग धर्माचे, समाधि (कुशल चित्ताची एकाग्रता) ठेवीत मन शांत व सयंमी कारण्याची विद्या शिकतात. तिसरे अंग प्रज्ञा, जिच्यामध्ये अंतर्मनातील सर्व अकुशल विचारांना कारणीभूत असलेले संस्कार (म्हणजे दोन्ही दूषित विचारांचा शरीरावर परिणाम व दूषित विचार) टप्याटप्याने समूळ नष्ट करण्याची विपश्यना विद्या शिकतात. अशा प्रकारे धर्म चर्चा, धर्म नियमांची माहितीची उजळणी व सामूहिक विपश्यना साधना करीत चित्त निर्मळ करतात.  मनाच्या विशुद्धी बाबत योग्य, यशस्वी निष्कलंक  व अनेकांना लाभ देणारी टेक्नीक (आर्य अष्टांगिक मार्गा) चा वापर करून मन निरोगी ठेवतात, असा उपोसथ हा परिपूर्ण व कल्याणकारी असतो. त्याला आर्य उपोसथ अथवा ब्रह्म उपोसथ (ब्रह्म विहारी आचरणाचा) सुद्धा म्हणतात!!


भगवंतांनी तिसऱ्या प्रकारच्या उपोसथाला परिपूर्ण व सुयोग्य उपोसथ घोषित केले आहे. 

मंगल व्हावे!
- संबोधन धम्मपथी 

संदर्भ 
२. महावग्ग 
३. परिशुद्धी : गौतम बुद्धाच्या काळात शील पाळण्याबाबतच्या व कायदेशीर दंडप्रक्रियेबाबतची  परिशुद्धी हि एक अत्यंत महत्वाची सभा होती . प्रतिमोक्षाच्या नियमांचे उजळणी/पठाण करण्यापूर्वी प्रत्येक भिक्क्षुने जाहीर प्रतिज्ञा करणे गरजेचे होते कि, 'मी प्रतिमोक्षाच्या एकाची नियमाचे उल्लंघन केलेले नाही'. त्यानंतरच प्रतिमोक्षाच्या नियमांची उजळणी व्हायची. हे सर्व मात्र स्थानिक भिक्षूंच्या समोरच व्हायचे. 
४. मुलोपसथ सुत्त (मुळ-उपोसथ सुत्त, मिगारमता विशाखेला उपोसथाची पद्धत समजावून सांगितलेली आहे   ), अंगुत्तर निकाय (इंग्लिश आवृत्ती :  https://www.accesstoinsight.org/tipitaka/an/an03/an03.070.than.html)
५. उपोसथ सुत्त : इथे भिक्षूंना धम्म व विनयाची विशेषतः समजावून सांगितलेली आहे )  -https://www.accesstoinsight.org/tipitaka/kn/ud/ud.5.05.than.html
६. उपोसथवरील लेख व संदर्भ  https://www.accesstoinsight.org/ptf/dhamma/sila/uposatha.html







Tuesday, 26 May 2020

पहिल्या आर्य सत्याबद्दल प्रश्नोत्तरे

प्रिय सर,

तुमच्या प्रश्नावर/विषयावर मत  मांडत आहे. 

 प्रश्न १: पहिले आर्य सत्य 'दुःख आहे' समजण्यासाठी बौद्ध होण्याची गरज नाही. मग पहिले आर्य सत्य हे नक्की काय सांगते ?

उत्तर: भगवान बुद्धांचे कोणतेही विचार समजण्यासाठी खरेच  बौद्ध होण्याची गरज नसून, सन्मार्गावर चालण्यासाठी अंर्तमुखी होऊन स्वतःचाच स्वभाव बदलण्याची गरज आहे. ती स्वभाव बदलण्याची पद्धतही बुद्धांनी दिली आहे. 

पहिले आर्य सत्य सांगते कि जगात दुःख आहे, म्हणजे  जन्म, आजारपण, म्हातारपण, प्रिय माणसाचे/घटनेचे  दुरावणे-अप्रिय माणसाचे/घटनेचे जवळ येणे, मनातील भ्रम/चिंता आणि मृत्यु हे सर्व दुःखाचे प्रकार आहे. पण मनुष्य हे मानतच नाही. हे समजण्यासाठी एक उदाहरण देतो:

जसे एका बेटात सगळे जसे एखाद्या रोगाने(जसे देवीचा व्रणाचा रोग) अनेक पिढ्यांपासून  ग्रस्त आहेत व त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीच  संबंधच नाही. तेंव्हा त्यांचा असाच भ्रम  होतो,कि हा रोग रोग  नसून,  मानवी जीवनाचाच टप्पा व भाग आहेत, जसे वयात आल्यावर मिशा येणे.  बाहेरून एक  विद्वान व निरोगी डॉक्टर येतो, तो सर्वाना बघतो व चार वाक्ये म्हणतो 


१. अरे तुम्हा सर्वाना तर हा देवीच्या व्रणाचा रोग आहे. 
२. ह्या रोगाचे कारण कारण अस्वच्छते मुळे येणारे विषाणु आहेत. 
३. ह्या रोगाचे निवारण शक्य आहे. 
४. ह्या आठ गोळ्या (आर्य अष्टांगिक मार्ग) खाऊन तुम्ही रोग मुक्त  होऊ शकता. 

पण त्या बेटावरील लोकांना त्याच्या म्हणण्यावर लक्ष देत नाही. कारण तो रोग म्हणजे जीवनाचाच हिस्सा म्हणून माणसाने तो स्वीकारलेला असतो. म्हणून माणसे विचारतात कि, पहिले आर्य सत्य विशेष असे सांगते?
कारण हे सर्व आम्हाला सर्व आहे, व आम्ही त्यासोबत जगणे शिकलो आहोत. 

जसे आपण स्वीकारतो कि खालील गोष्टी/ संकटे मानवी जीवनाचाच भाग आहेत , 
१. कुठलेही वाईट कामे करा पण पकडले जाऊ नका. 
२. मग इतरांना लाच देऊन बाहेर पडा, व काहीच न  घडल्याचा दिखावा करा 
३. विवाहबाह्य संबंध, बलात्कार -हत्या, स्त्री पुरुष असमानता

४. जातीयवाद, भ्रष्टाचारी माणसे, सांप्रदायिक दंगे, जमावाद्वारे हत्या, प्रदुषण  
५. पक्षपात,  आत्महत्या, घटस्फोट, प्रेमभंग,  अकाली मृत्यु , महामारी 
६. अनियोजित शहरे, राष्ट्रीय मालमत्तेचे खाजगीकरण, आळशीपणा, 
७. तिरस्कार-चिडचिड,  क्रोध, अज्ञानीपणा, विसरभोळेपणा, मनोविकार, अहंभाव, भीती-शंका, मोह-मुढता (इच्छांचे पारतंत्र्य )

तो बाहेरून आलेला डॉक्टर हे सांगतो अरे हे सर्व जीवनाचा भाग नाहीत, हे रोग आहेत जे कुठल्याही ईश्वराने दिलेले नाहीत. कारण / विषाणु/अविद्या नष्ठ केली कि जीवनात निर्मळ  सुख निश्चित आहे.





तो डॉक्टर म्हणतो हे वरील सात गोष्टी/ संकटे  तुम्ही जीवनासोबत घेऊन जगत आहात, पण कायमचा सोडवण्याचा प्रयत्न नाही करत. त्या वरून लक्ष हटवण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करता :
१. खेळ खेळणे-पाहणे, टीव्ही-नाटक-चित्रपट-पॉर्न पाहणे 
२. विविध वाढदिवस-लग्न-कार्यक्रम-उत्सवात संगीत-नाच-गाणे-पार्टी-कर्मकांड  करून इतरांना दाखविणे कि बघा मी-माझे कुटुंब-माझा समाज कसा खुश आहे 
३. पुस्तकात -गप्पात -मोबाईल-कॉम्पुटर  मध्ये मन गुंतविणे 
४. शेवटी दारू-व्यसने-झोपेच्या गोळ्या-आत्महत्या 
५. सौन्दर्य प्रसाधनाद्वारे म्हातारपण/आजारपण लपविणे 


म्हणून समजून घ्या पहिले आर्य सत्य व बाह्यजगात सुखाचे-दुःखाचे कारणे शोधणे थांबवा. शाश्वत/पर्मनंट सुखासाठी स्वावलंबी-अंतर्मुखी व्हा. 


   प्रश्न १:    बाबासाहेब आंबेडकरांनी चार आर्य सत्यांवर शंका  का  घेतलेली आहे ? 

उत्तर:बाबासाहेबांनी कधीही कुठलाही ग्रंथ किंवा मत डोळे झाकून स्वीकारलेले नाही. बुद्धाचेही नाही!
तसे तुम्हीही डोळे झाकून स्वीकारू नका, असे बुद्धानेही सांगितलेलं आहे. उपस्थितअधिकृत बुद्ध वाणी  साठी आपल्याला मुळ त्रिपिटक अभ्यासावे लागते, जो गुरु-शिष्य परंपरे द्वारे अनेक भिक्षूंच्या वैयक्तिक समजेतून व आठवणींतुन बनला आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी, त्यांच्या 'बुद्ध व त्यांचा धम्म' ग्रंथांत एकूण चार विषयावर  शंका उपस्थित केली आहे व पुढील संशोधनासाठी आपल्याला आवाहन केले आहे. त्यातली दुसरी शंका, आर्य सत्यांबद्दल आहे. एक महत्वाचे म्हणजे एखाद्या विषयावर शंका उपस्थित करणे व तो विषयच नाकारणे यात खूप खूप फरक आहे. 

 त्यांच्या वरील सांगितलेल्या ग्रंथात, त्यांनी आर्य सत्यांसाठी वेगळा धडा दिलेला नाही  बाबासाहेबांनी शंका उपस्थिक केली आहे, आर्य सत्य नाकारलेले दिसत नाही. आर्य सत्याच्या मानवकल्याणाबाबत काही प्रश्न  मांडले आहेत. जर त्या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळाले तर बाबासाहेबांना आर्य सत्याबद्दल काही हरकत नसावी.  

 कारण पण, त्याच ग्रंथात त्यांनी अनेक ठिकाणी चार आर्य सत्यांचा उल्लेख धम्म समजावताना केलेला दिसतो. 

१. सम्यक मार्गाचे अनुसरण : खंड ४, भाग तिसरा  
२. सदाचरणासंबंधी प्रवचन : खंड ४, भाग चौथा 
३. का बौद्ध धम्म निराशावादी आहे?  खंड ६, भाग तिसरा 

कमीत कमी  तीन संदर्भ मला बाबासाहेंबांच्या ग्रंथात दिसल्याने ,बाबासाहेबांनी आर्य सत्य नाकारली हे अजिबात म्हणता येणार नाही. 

 अजून महत्वाचे कि,  ज्या एकूण चार शंका बाबासाहेबांनी मांडल्या आहेत त्या सर्वच्यासर्व शंकाचे उत्तर बाबासाहेबांनी त्याच ग्रंथात दिलेले आहेच .  तरीही ते इतिहासतज्ञ असल्याने वाचकांना सजग राहण्यासाठी त्यांनी सर्वच्यासर्व शंकाचे उत्तर आपल्याला पुढे शोधण्याचे आवाहन केले. कारण प्रगती, शोध-प्रक्रिया व यश हे कायमचे नसते. 

आपल्या वाचनात हे मिळाले आहे कि, जरी पहिले आर्य सत्य दुःख असले तरी वरील प्रश्न १ च्या उत्तरामध्ये सांगितल्याप्रमाणे बुद्धाने फक्त दुःखच आहे हे सांगून शांत नाही बसले. त्यांनी पुढील तीन आर्य सत्यात सांगितले कि त्याचे निराकरण शक्य आहे व  निराकारणाचा खात्रीलायक उपायही सांगितला आहे. 


त्यामुळे चार आर्य सत्यांबद्दल मनात शंका ठेवणे हे योग्य नाही. बाबासाहेंबांनीही त्यांच्या ग्रंथात धम्म समजावताना उद्घृत केलेली व समजावून सांगितलेली आहेत. 

संभ्रमात/विवादात पडून मनुष्य जन्म वाया घालवू नये, व्यवस्थितरीत्या वाचन करावे.

 मंगल व्हावे !!


संबोधन धम्मपथी 

Thursday, 7 May 2020

अग्निवेश सच्चक पुण्य वितरणाची ची छोटी कथा (मज्झिम निकाय )


सच्चकाची पुण्य वितरणाची कथा

 ही कथा बुद्ध व सच्चकाची असून तिची सुरुवात ही सच्चकाने बुद्धाला वादविवादात पराभूत व अपमानित करण्याची दवंडी पिटत केली होती. त्या वेळी बुद्धाने मनाच्या कर्माचे महत्व, शारीरिक कर्माच्या महत्वापेक्षा जास्त आहे हे स्वानुभवाने समजावून सांगत सच्चकला अनित्यबोध व कर्मसिद्धांत समजावून सांगितला .  सच्चकाने संपूर्ण घामाघूम होत त्याचा पराभव स्वीकार केला, तसेच बुद्धाच्या अगणित गुणांचा हि जयघोष केला. हि कथा जयमंगल अट्ठगाथेत आली आहे.

ह्या कथेच्या शेवटी, सच्चक परिव्राजक (संन्याशी ) याने आदरासहित बुद्ध-प्रमुख संघाला  दुसऱ्या दिवशी भोजनदानाला बोलावले. संन्याशी असल्यामुळे त्याची एवढी तयारी व सामग्रीही नव्हती. तरीही श्रद्धेने त्यांना बोलावले पण नंतर, ५०० लिच्छवींना (त्यावेळेचे तिथले स्थानिक नागरिक) विनंती केली कि, उद्या बुद्ध-प्रमुख संघाला भोजनदान  आहे त्यामुळे तुम्ही योग्य ते समजून -उमजून कार्य करावे!! त्या  लिच्छवीं नी  योग्य दान केले. भोजनानंतर सच्चकाने बुद्धांना विनंती केली कि भोजनदानाचे पुण्य दायकांना ( लिच्छवींना ) मिळावे. त्यावर भगवान म्हणाले कि, "निर्वाणप्राप्त (म्हणजे वीतराग- वीतमोह- वीत दोष) भिक्षूंना  भोजनदान दिल्याचे पुण्य सच्चकाला मिळेल, आणि इतर दायकांना अजून निर्वाण न मिळालेल्या   (म्हणजे अ-वीतराग,अ-वीतमोह, अ-वीत दोष) भिक्षूंना  भोजनदान दिल्याचे पुण्य मिळेल!!"

हि कथा पूर्णपणे  इथे हिंदीत दिलेली आहे: https://suttacentral.net/mn35/hi/sankrityayan


प्रश्न : सच्चकाने बुद्धांकडे  दायकांसाठी पुण्यवितरणाची विनंती केल्यावर भगवंतांनी पुण्याचे विभाजन दोन प्रकारे का केले ?

संबोधन धम्मपथींचे उत्तर: 

असे नक्की भगवंतांनी का केले असे सांगणे कठीण आहे कारण असे पुण्याचे विभाजनाची कथा वाचनात आलेली नाही. तसेच असे पुण्य विभाजनाचे स्पष्टीकरण हि वाचनात किंवा ह्या कथेत आलेले नाही. पण बुद्धाच्या तत्वज्ञानातून व कर्मसिद्धांताच्या आधारे उत्तर देत आहे. तर्काद्वारे तपासून घ्यावे

ह्या कथेचे वैशिष्टयं म्हणजे पुण्यवितरणाचे विभाजन भगवंतांनी सांगितले आहे. सच्चकाचे भ्रम दूर झाल्यावर त्याला भगवंतांना संघासहित भोजनदान व गौरव द्यायची प्रबळ इच्छा झाली. पण स्वतः संन्याशी असल्याने मोठ्या भिक्षुसंघासाठी आवश्यक सामान नव्हते. पण तरीही मागेपुढे न पाहता त्याने भगवंतांना भिक्षु संघासहित भोजनदानासाठी येण्याची विनंती केली. भगवंतांनी मौन राहून स्वीकृती दिल्यावर, त्याने उपस्थित लिच्छवींना विनम्र आवाहन केले कि, उद्या बुद्ध-प्रमुख संघ भोजनदानासाठी येत आहे, तरी आपण सर्वांनी असे काही करावे कि ते ह्या परिस्थितीला योग्य आहे. वैशाली नगरीचे स्थानिक (लिच्छवी) तर अगोदर पासून त्रिरत्नांबद्दल श्रद्धावान होते. सच्चकाच्या आवाहन व योजने प्रमाणे त्यांची पहाटेच ५०० स्वयंपाक सहकारी व योग्य व्यवस्था केली. 


भोजनानंतर सच्चकाने कृतज्ञ राहत, लिच्छवींचे उपकार समजून भगवंतांना विनंती केली भोजनदानाचे पुण्य दायकांना ( लिच्छवींना) मिळावे. त्याने स्वतः साठी काहीही मागितले नाही. तो वास्तविक समाधानी झाला  होता. माझ्या मते दोन कारणांमुळे सच्चकाने स्वतःसाठी काही मागितले नसावे. पहिले कारण कि त्याला त्याच्या आयुष्यात (बुद्धांपुर्वी) शारीरिक कर्माला मानसिक कर्मां पेक्षा जास्त महत्व द्यायची शिकावण मिळाली होती. आणि त्याला  वाटले कि हे भोजनदानाचे पुण्य  शक्य झाले ते लिच्छवींनी  केलेल्या दानामुळे, जे होते प्रामुख्याने शारीरिक (व द्वितीय मानसिक) कर्म. बुद्ध प्रमुख संघाला श्रद्धा व गौरव पूर्वक बोलावण्याची संकल्पना-योजना (प्रमुख मानसिक कर्म) जरी  सच्चकाने मांडली असली तरी त्याच्या आतापर्यंतच्या शिकवणी प्रमाणे हि योजना (आयडिया) मानसिक कर्म असल्याने व तो मानसिक कर्माला शारीरिक कर्माच्या  पुढे तुच्छ मनात असल्यामुळे त्याने स्वतः ला पुण्याचा हकदार मानले नाही. 


दुसरे कारण असे, कि प्रामाणिकपणामुळे खऱ्या दायकांचे/दानकर्त्यांचे नाव तथागतांना सांगून त्यांनाच भोजनदानाचे पुण्य मिळावे एवढा मनाचा मोठेपणा त्याने अध्यात्मिक आनंद (प्रमुदित/बोध) त्याने तथागतासोबतच्या पहिल्या भेटीतच कमविला. 


तथागतांना अनेक ऋद्धी अर्जित केल्या होत्या.  त्यातील एक छोटीसी ऋद्धी म्हणजे परिचित्त ज्ञान; म्हणजे दुसऱ्याच्या मनाची स्थिती/विचार ओळखणे. त्यांनी  सच्चकाच्यामनाची स्थिती अगोदरच ओळखली होती.  

कर्मांचे वर्गीकरण :
तथागतांच्या कर्म सिद्धांतानुसार इथे भोजनदानासाठी मुख्यतः दोन कर्मे केलेली आहेत:

१. बुद्ध प्रमुख संघाला श्रद्धा व गौरव पूर्वक बोलावण्याची संकल्पना-योजना (प्रमुख मानसिक कर्म)  सच्चकाने मांडली व लिच्छवींना दानासाठी विनम्र आवाहन केले. 

२. लिच्छवींना विनम्र आवाहनाला प्रतिसाद देत (सच्चकाच्या आवाहनानंतर दान देण्याचा विचार करून)  उचित दान केले

त्यामुळे पहिले कर्म हे आद्य कर्म असून ते प्रमुख मानसिक आहे, तसेच दुसरे कर्म हे आद्य नसून लिच्छवींद्वारे किती तत्परतेने केले गेले  हे तथागतच ओळखू शकतात. पण एवढे मात्र नक्की आहे कि, जर पहिलेच कर्म नसते झाले तर दुसरे कर्म कसे झाले असते? त्यामुळे पहिले कर्म (निर्मळ मानसिक कर्म ) हे दुसऱ्या (निर्मळ मानसिक व शारीरिक)  कर्माच्या तुलनेत अधिक बलवान आहे, प्रबळ आहे. 

हे हि महत्वाचे कि इथे दोन्ही गटांचे (सच्चक व लिच्छवींचे) मन निर्मळ  होते, जर ते निर्मळ  नसते तर पुण्य त्या संवेगाने मिळाले नसते. दान/कर्म करताना मनाची निर्मळता व  दान/कर्माचा परिणाम ठरवतो कि कर्म कुशल झाले कि अकुशल!!

संघातील भिक्षूंचे निर्वाणमार्गातील प्रगतीनुसार वर्गीकरण :

संघात प्रत्येक भिक्षूं ची अवस्था सारखी नसते. निर्मळतेच्या/ चित्त विशुद्धीच्या वेगवेगळ्या आठ पातळीचे भिक्षु असतात. त्या अवस्था खालील प्रमाणे आहेत . पहिली अवस्था तुलनेने कमी फलदायी तर आठवी तुलनेने सर्वात जास्त मंगलमय व जास्त फलदायी आहे:

१. स्रोतापन्न अवस्था (बुद्ध होण्यासाठीची पहिली पायरी) प्राप्त करण्याचा प्रयत्न करणारे 


२. स्रोतापन्न  अवस्था प्राप्त केलेले 


३. सकदागामी (बुद्ध होण्यासाठीची दुसरी पायरी) अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करणारे  आणि स्रोतापन्न  अवस्था प्राप्त केलेले 


४. सकदागामी (व स्रोतापन्न) अवस्था प्राप्त केलेले 


५. अनागामी  (बुद्ध होण्यासाठीची तिसरी/शेवटची  पायरी) अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करणारे णि सकदागामी  अवस्था प्राप्त केलेले 


६. अनागामी (व  सकदागामी) अवस्था प्राप्त केलेले 


७. अरहंत/बुद्धत्व  (निर्वाणीक/अंतिम/सर्वोच्च ) अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करणारे 


८. अरहंत/बुद्धत्व  ( निर्वाणीक/अंतिम/सर्वोच्च) अवस्था प्राप्त केलेले 



सम्यक संबुद्ध संशोधित(शोधलेली)  विपश्यना साधना करीत, मनुष्य ह्या निर्मळतेच्या उच्चतम अवस्था प्राप्त करत अरहंत/बुद्ध बनतो. पुढच्या अवस्थेतील मनुष्याला दिलेल्या दानाचे पुण्य मागच्या अवस्थेतील मनुष्याला दिलेल्या दानाच्या  पुण्यापेक्षा अधिक मोठे असते. 
सच्चकाने सम्यक संबुद्ध प्रमुख संघाला भोजन दानासाठी बोलावून (निष्कपट व सकल ) आद्यकर्म केले व त्याद्वारे तो प्रमुख संयोजक झाला. त्यामुळे सर्वाधिक महापुण्याचा प्रमुख दावेदार झाला. 


सच्चकाच्या ह्या ऐतिहासिक सत्य कथेत, संयोजनेद्वारे आद्य कर्म सच्चकाने केल्यामुळे व तथागत मानसिक कर्माला शारीरिक कर्माचे बीज मानतात त्यामुळे तथागत सच्चकाला  म्हणाले कि, "निर्वाणप्राप्त (म्हणजे वीतराग, वीतमोह, वीतदोष अर्थात आठवी अवस्था ) भिक्षूंना  भोजनदान दिल्याचे पुण्य सच्चकाला मिळेल, आणि इतर दायकांना अजून निर्वाण न मिळालेल्या   (म्हणजे अ-वीतराग,अ-वीतमोह, अ-वीत दोष अर्थात पहिली ते सातवी अवस्था प्राप्त ) भिक्षूंना  भोजनदान दिल्याचे पुण्य मिळेल!!" . 


ह्या विशेष सत्यकथेत तथागतांनी 
सच्चकाला  मानसिक कर्माचे महत्व तसेच निर्मळ मनाच्या अवस्थेतील मनुष्याला (भिक्षु/भिक्षुणी/साधक/साधिका) दिलेल्या दानातुन मिळालेल्या पुण्याच्या दर्जाचे महत्त्व समजावून सांगितले आहे. 


ह्या कथेनुसार हुशार मनुष्याने योग्य (निर्मळ व लोककल्याणमार्गी) मनुष्याला वेळोवेळी उचित दान करीत मंगल साधावे, ही आज बुद्ध पौर्णिमेच्या मंगल दिनी सदिच्छा !!  


मंगल हो!

संबोधन धम्मपथी 

Sunday, 5 January 2020

लोकाभिमुख प्रश्नोत्तराच्याद्वारे नियमित धर्मचर्चेचे आयोजन व नियोजन प्रणाली

लोकाभिमुख प्रश्नोत्तराच्याद्वारे नियमित धर्मचर्चेचे आयोजन व नियोजन प्रणाली 

सद्धर्म प्रेमी साधक व साधिकांहो नमस्कार. परियत्ती म्हणजे धम्म कथांचे वाचन ध्यानात करताना (पटीपत्ती) तसेच निपुण होण्यासाठी (पटीवेधन) खूप आवश्यक असते असे कल्याणमित्र गोएन्काजींनी अनेको वेळा सांगितलेले आहे.   धम्मकथांचं वाचन करताना अनेक कठीण प्रश्न, शंका, व द्विधा मनस्थिती समोर येते. अशा वेळी आवश्यक मार्गदर्शन तत्परतेने व सुयोग्य पद्धतीने न मिळाल्यास निराशा, कंटाळा व अपेक्षाभंग होतो. मग अशा वेळी कुठे जावे व कोणाला  प्रश्न विचारावे? 


सध्या बुध्दविहारात जाणारे बहुतेक माणसे हि प्रामुख्याने बौद्ध संप्रदायातील असतात. पण आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएन्काजीं, आदरणीय महास्थवीर दलाई लामांद्वारे शुद्ध बुद्धवाणी लोकांपर्यंत पोहोचल्याने नवनवीन माणसे जी बौद्ध नाहीत, ती ही अबौद्धच राहूनही बुध्दवाणी व विपश्यना   (प्रॅक्टिकल लाभ) कडे आकर्षित होऊ लागली आहेत. मुळात बुध्दवाणी समस्त  मानवकल्याणासाठी असून तिला फक्त एका बौद्ध संप्रदायासाठीच आहे असे मानणे, म्हणजे  तिला संकुचित/छोटे करण्यासारखे आहे.

बुद्धवाणी हि पूर्णतः  सार्वदेशीक, सार्वकालीन सार्वजनिक  च आहे, ती फक्त बौद्धांसाठीच आहे हा आपला मोठा  हीन व जुना भ्रम आहे.  त्यामुळे आता बुद्धविहारात नवनवीन संकल्पनांवर आधारित सार्वजनिक  उपक्रम (जसे नियमित धर्मचर्चा, विपश्यना ध्यान सत्रे व धम्म प्रश्नोत्तरे नियोजन)  ज्याने ज्ञानाची तहान पूर्ण होईल, अशा पद्धतीने राबवणे अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय व्यक्तीला धम्मात ओढा, रस किंवा उत्साह वाढेल, अशांती दूर होईल असे मानणे निव्वळ अंधश्रद्धाच आहे असे मी मानतो.  नुसत्या बुद्ध वंदनेने जनतेची जिज्ञासा अपूर्णच राहील, बैचेनी दूर होणार नाही; यामुळे बहुदा एकूणच बुद्धवाणीच्या वैयक्तिक लाभ सदैव अस्पष्टच  राहिला आहे. 


ही  ज्ञानजिज्ञासा परिपूर्ण न होण्याचे प्रमुख खालील करणे आहेत. 
१. धम्मप्रवीण व विपश्यनायुक्त ज्ञानी, थोडक्यात, उदाहरणासह  व मुद्देसूद उत्तरे देणारा व्यक्ती न मिळणे. 
२. विहारात लोकांना हवे असलेल्या विषयाची, धम्म-सुत्ताची/बुद्धवचनावर आधारित प्रश्न विचारायची सुविधा नसणे. 
३. एखाद्यावेळेस जरी सुविधा प्रश्न -उत्तराची सुविधा असली तरी, विहारात लोकांना हवे असलेल्या विषयाची, धम्म-सुत्ताची/बुद्धवचनाची किंवा प्रश्नांची समाधानकारक/सुयोग्य उत्तरे न मिळणे. 

बुध्दविहारातील कार्यतत्पर कमिटी कडून अशी प्रमुख आशा आहे कि त्यांनी याची उत्तम, निरंतर, सार्वजनिक  व  सुनियोजित अशी प्रणाली राबवावी. 

विभाग १: प्रश्नउत्तराच्या प्रणालीची व्यवस्था : 
१. प्रणालीद्वारे बुद्ध विहार कमिटीने अभ्यासू/जिज्ञासू  लोंकाचे सल्ले व प्रश्न दोन्ही विश्वासु पद्धतीने सोडविता आले पाहिजे किंवा समाधान करता आले पाहिजे. अशा प्रकारे समाधान झाले पाहिजे कि त्या व्यक्तीला अधिक ज्ञान ग्रहण करण्याची व धम्मविकासासाठी बुद्ध विहारासोबत जोडून राहण्याची गरज वाटावी . 
२. सल्ले व प्रश्न देणाऱ्याच्या नावाची गुप्तता राखून त्याचा  विश्वास संपादन करता यावा. कारण, हे तेच लोक आहेत, ज्यांच्या पर्यंत धम्म सुयोग्य पद्धतीने पोहोचवण्याची जबाबदारी बुद्धाने त्यांच्या शिष्यावर(म्हणजे  आपल्यावरच)  दिलेली आहेत. बुद्धांनी ही ती स्वतः हि पूर्ण केली होती
३. ही  प्रणाली निरंतर/नियमीत कार्यरत  असावी जेणेकरून सल्ला व प्रश्नांची उकल होऊन पुढची पायरी गाठून, त्यांच्या विश्वास जिंकून, त्यांना धम्मात प्रगत बनवून सुखी बनण्यास मदत व्हावी. मग तदनंतर बहुजन हिताय व बहुजन सुखाय उद्देश्याने, धम्म प्रसाराच्या  कामात त्यांना एक्सपर्ट/प्रवीण बनविता यावे.
४. नियमितपणे साधारण दर  महिन्यातून एकदा किंवा दर दोन महिन्यातून एकदातरी हे सर्व सल्ले/प्रश्न विहार कमिटीने तज्ज्ञांच्या समोर व धम्म श्रोत्यांच्या ज्ञान वाढीसाठी धर्मचर्चे द्वारे घ्यावे.
५. प्रश्न विचारायचा छोटासा फॉर्म असेल तर खूपच छान होईल. त्याद्वारे, प्रश्न विचारणारचा वय, शिक्षण, व्यवसाय, लिंग, व मुळ प्रश्न विचारता येईल. या माहितीवर व उदाहरणासह दिलेले उत्तर परिपूर्ण व कल्याणकारी ठरेल.
सर्वांसमक्ष प्रश्न-सल्ला पेटी असावी 



विभाग २: सल्ला-धम्मप्रश्न स्वीकारण्याची प्रणालीची पद्धत : 
१. जसे टाळा लावून समोरच ठेवलेली दानपेटी असते, तशीच वेगळी टाळा लावून समोरच ठेवलेली सल्ला व प्रश्न पेटी असायला हवी. 
२. प्रश्नाचे उत्तर किती दिवसाच्या आत, कोणत्या धम्मतज्ञाकडून (भंतेजी /उपासकाचे नाव ), व लेखी कि तोंडी स्वरूपात हवी, स्वतःचे नाव प्रकाशित किंवा गुप्त असावे ते बुद्ध विहार कमिटीला कळविता आले पाहिजे.
३. कल्याणकारी व हितकारी सल्ला व प्रश्नाला कौतुक किंवा छोटेसे बक्षीसही देता यावे. 
४. ज्या प्रश्नाने लोक कल्याण होत नाही असे प्रश्न सर्व कमिटीच्या संमतीने रद्द करता यावे, पण त्याचे कारण उपस्थित जनतेला कळवावे. 
५. प्रत्येक सत्राला  एक विषय मर्यादा असते, हे सत्र बुद्ध वाणीचे असल्याने त्यात नौकरी-व्यवसाय, वैयक्तिक  मार्गदर्शन, राजकीय-सामाजिक घडामोडीवर आधारीत विषय धम्माचरणाच्या अनुषंगाने आले तरी त्यावरील चर्चेस प्रमाणापेक्षा अधिक वेळ देऊ  नये. वैयक्तिक विकासावर लक्ष असावे, विवादामध्ये नाही. 
६. धम्म प्रश्न विचारणाऱ्याला स्वतःचे नाव गुप्त ठेवण्याची सोय व प्रत्येक प्रश्न विचाराधीन असल्याची खात्री आयोजन कमिटीमार्फत करून घेता येण्याची तजवीज/सोय असावी . 

विविध ग्रंथ, विविध माध्यम व ध्यानातून ज्ञान वाढवणारा असावा


विभाग ३: सल्ला-प्रश्नाला उत्तर देण्यासाठी धम्मतज्ञाची/कल्याणमित्राची निवडीची पद्धत : 
१. धम्म तज्ज्ञाकडे देश-परदेशातील विविध भिक्षु व उपासकांच्या धम्म संशोधनाचे/पुस्तकाचे ज्ञान असावे . 
२. तो विपश्यना साधक असून वेळोवेळी साधना करत असावा  व त्याच्या वागण्या-बोलण्यातून कल्याणमित्रतेची खात्री करता यावी .
३. तो कल्याणमित्रांचे (जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर , सत्यनारायण गोएन्काजी, महास्थवीर दलाई लामा, महास्थवीर भिक्षु नारद ) प्रश्नोत्तरांच्या सत्राचे उत्तम अभ्यासक असावा.  तसेच यापूर्वी इतरांना धम्म विषयक सल्ला-प्रश्नउत्तरे देण्याचा अनुभवही असल्यास उत्तम 
४. कल्याणमित्रास प्रश्नाचे स्वरूप, प्रश्न विचारणाऱ्यांचा उद्देश, त्याची बुद्धिमत्ता, त्याची शिक्षण-व्यावसायिकता याच्या आधारे मुद्देसुद पण (आजच्या युगातल्या व सोप्या ) उदाहरणाद्वारे उत्तरे देता यायला हवे. 
५.विविध प्रकारच्या प्रश्नाला स्वतः बुद्धांच्याच पद्धतीने  विविध प्रकारांद्वारे [१. फक्त एका वाक्यात, २. विनम्रतेने प्रतिप्रश्न विचारून, ३, विस्तारित स्पष्टीकरणाद्वारे ४. (उद्धट/अज्ञ लोकांना) उत्तर न देता शांत राहून ] देण्यात तरबेज असावा. 
६. त्याचे प्रश्न विचारणाऱ्याकडे पूर्ण लक्ष असावे, प्रश्न समजून, प्रश्नाच्या मागचा उद्देश्य समजून,  प्रश्नाच्या उत्तरासाठी लागणारा कालावधी समजून-उमजून उत्तर देण्याचे कौशल्य असावे . 
७.कल्याणमित्रास जर उत्तर येत नसेल तर ते विनम्रतेने कबुल करून, उत्तरासाठी वेळ मागुन उत्तर मिळविण्यासाठी संशोधन करण्यास तो तयार असावा. उलटपक्षी वाईट वाटून घेणारा  /नाराज होणारा कल्याणमित्र नको, कारण सगळ्याच ८४,००० बुद्ध वचनांचे ज्ञान इथे बहुतेकांना नाही. 
८.कल्याणमित्रास अंगुत्तर निकाय / दीघ निकाय सारख्या ग्रंथातील विविध सुत्तांचा/कथांचा सुयोग्य अभ्यास करण्याचा उत्तम अनुभव असायला हवा. 
९.कल्याणमित्राचे  मराठी व हिंदी भाषेवर छान प्रभुत्त्व असावे
१०. त्याचे व्यक्तिमत्व कुशल, दाढी-मिशा-केस सुयोग्य हवे, बोलण्यात माफक, कपडे नीटनेटके व इस्त्री केलेले, स्वभाव विनम्र, मोबाईल फोन चा प्रमाणात/काटकसरीत वापर असायला हवा. 
११. स्वतःचे मत लादण्यापेक्षा दुसऱ्याच्या मेंदूला चालना देऊन प्रवृत्त करण्यावर त्याचा अधिक भर असावा . कला विकसित असायला हवी.
१२. कार्यक्रमाच्या ठराविक वेळेत थांबण्याची तयारी व संयम असावा. 
१३. ज्या विषयाने दोन व्यक्तित, दोन जातीत किंवा दोन संप्रदायात (जसे हिंदू, बौद्ध मुस्लिम इत्यादी ) ताण व द्वेष-दुर्भावाना वाढेल असे प्रश्न, उत्तरे  व विषय घेऊ नयेत. 
१४. कुठल्या विषयाला लोककल्याणाच्या/लोकहिताच्या किती महत्व व वेळ द्यावा याची बुद्धिमत्ता असायला हवी.
१५. पाली भाषेचे ज्ञान असले कि छान पण, भाषेचे ज्ञान असले कि व्यक्ती हुशार, चतुर व धम्मनिपुण असेलच हे अजिबात गरजेचे नाही. उदा. मराठी भाषा  येत असलेला असलेला प्रत्येक व्यक्ती बुद्धिमानच असेलच असे गरजेचे नाही

विभाग ४: लोकांकडून मिळालेल्या सल्ला-प्रश्नांची निवड प्रक्रिया :
१. हा प्रश्न बहुजन हिताय व बहुजन सुखाय दृष्टिकोनातून आवश्यक आहे. 
२. ह्या प्रश्नाने दोन व्यक्तित, दोन जातीत किंवा दोन संप्रदायात ताण व द्वेष-दुर्भावाना वाढणार नाही. 
३. जो प्रश्न जास्तीत जास्त लोकांना लाभदायक आहे व कल्याणकारी आहे असा प्रश्न अगोदर घ्यावा. 
४. जो प्रश्नाचा उद्देश्य विनम्रतेने ज्ञान मिळवणे हा नसून, निव्वळ दुसऱ्याचे ज्ञान तपासणे हा आहे असा प्रश्न घेऊच नये. 
५. जो प्रश्न धम्म आचरणाच्या (जीवनात अंगिकारण्याच्या) दृष्टीने लाभदायक आहे असा प्रश्न अगोदर घ्यावा. 
६. बैचेनी, अनैतिक संबंध, आत्महत्या किंवा भीती अशा प्रश्नांना योग्य धम्मातज्ञ व योग्य वेळ व जास्त महत्व द्व्यावे. 
७. पुर्नजन्म बाबत प्रश्न जे सिद्ध करणे अशक्य आहेत, अशाना कमी महत्व किंवा जास्त तयारीनिशी दुसरे विशेष सत्र घ्यावे. 
८. जर प्रश्न विचारणाऱ्याला स्वतःबद्दल गुप्तता बाळगायची असल्यास पूर्ण आदरासह ती गुप्त प्रश्न सोडविता यावा.
९. प्रश्न निवडण्याची प्रक्रिया म्हणजे प्रश्न का नाही घेतला तेही स्पष्ट करावे.
आदरासह विचार विमर्श करणारे असावेत


विभाग ५. व्यासपीठावर सल्ला-प्रश्नाला उत्तर देण्यासाठी धम्मतज्ञाची/कल्याणमित्राची नियम :
१. दुसऱ्या धम्मतज्ञाला उत्तर देण्याची संधी मिळाल्यास, जोपर्यत मतप्रदर्शनाची विनंती येत नाही तोपर्यंत स्वतः मध्ये बोलू नये. अगोदर नियोजित दुसऱ्या तज्ञाचे विचारप्रदर्शन पूर्ण व्हावे, मग नियंत्रकाला विचारून मत मांडावे. 
२. दुसऱ्याच्या मताचा आदर करावा, कारण एखादे संदर्भ/मुद्दा/दृष्टीकोण/विचारप्रणाली एकूण ८४,००० बुद्ध वचनांपैकी तसेच आपल्यापेक्षा योग्य किंवा आपल्यासाठी नवीन नक्कीच असू शकते . 
३. आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या धम्मतज्ञाला उत्तराचा संदर्भ विनम्रतेने विचारून घ्यावा. 
४. स्वतःचे उत्तर ३-४ मिनिटात आटोपशीर ठेवावे व उत्तर मद्देसुद असावे. 
५. उत्तरासाठी दिलेला वेळ संपण्याची बेल वाजली, कि तिला मान देऊन निष्कर्ष सांगत शांत बसायला हवे. 
६. मोबाईल बंद किंवा प्रशांत स्थितीत असणे बंधनकारक आहे, कार्यक्रमाच्या वेळेत फोन घेण्यास मनाई आहे; भन्तेजींना ही पूर्ण मनाई आहे. एकूणच फोनचा आवाज व व्यत्ययही नको आहे. 
७. इतर संप्रदाय (हिंदु, मुस्लिम व अन्य ) व जाती-प्रजाती बद्दल नावे/दुषणे ठेवणे , ईर्ष्या-मत्सर बाळगुन बोलणे नको आहे. 
८. भंतेजीना आवश्यक तेवढा आदर नक्की द्यावा पण प्रत्येक वेळेस भंतेजी म्हणतील तीच पूर्वदिशा अशी अंधश्रद्धा बाळगून जनतेचे विचार स्वातंत्र्य धोक्यात आणू नये. 
९. एखाद्याचा मुद्दा परिपूर्ण योग्य वाटला तर साधू-साधू -साधू बोलावे अन्यथा शांत बसावे. 
१०. एखाद्याचा मुद्दा न पटल्यास/अयोग्य वाटल्यास तिथेच सर्वांसमोर खोदून काढू नये, सबुरीने घ्यावे व कार्यक्रमानंतर त्या व्यक्तीस ग्रंथांचे संदर्भ किंवा तर्कशुद्धता पटवून सांगण्याचा विनम्र प्रयत्न करावा.
नोंद : हा नियम बुद्धांनीच दिला आहे. 
  व तसेच  विषय  गंभीर असल्यास आयोजकांना त्याची लेखी/तोंडी योग्य माहिती जनकल्याण्यासाठी द्यावी; स्वतःचे मोठेपणा सिद्ध करण्यासाठी नाही.
११. उत्तर दिल्यावर समाधान झाले का , याचीही खात्री करावी. झाले नसल्यास पुन्हा प्रयत्न करावा किंवा दुसऱ्या तज्ज्ञाला उतररसाठी विनंती करावी



विभाग ६: व्यासपीठावर सल्ला-प्रश्नाला उत्तर देण्यासाठीची पात्रे /माणसे :
इथे फक्त खालील प्रकारची पात्रे आहेत. 
१. धम्मतज्ञ/कल्याणमित्र:  जास्तीत जास्त फक्त १-३ धम्मतज्ञ/कल्याणमित्र हवे. भिक्क्षुच असावे असा अट्टाहास नाही. ध्यानप्रवीण, अभ्यासु, विनम्र व मुद्देसूद मांडणी करणारा असावा. 
२. निवेदक: एक प्रश्न व्यक्ती धम्मतज्ञ/कल्याणमित्रांना प्रश्नावलीतून प्रश्न देणारा. प्रश्नाचे मूळ उत्तर न मिळाल्यास प्रश्न विविध प्रकारे विचारणारा चतुर व्यक्ती. 
३. नियंत्रक : प्रश्नासाठी वेळेची मर्यादा देणारा, विषय भरकटल्यास संदेश देणारा, एकूण प्रश्नांची संख्या ठरवणारा बुद्धिमान, खंबीर, सूचक  पण विनम्र व्यक्ती असावा. 
४. धम्म श्रोतागण : हि अशी मंडळी आहेत ज्यांना विविध प्रश्न, विषयावर धम्म ज्ञान व परामर्श हवा आहे. विवाद/झगडा करण्याचा उद्देश्य नसणारी हवीत. हि सर्वात महत्वाची मंडळी असून, जर याना मानपूर्वक नाही वागविले तर तुम्ही धम्म दान देणार कुणाला? व नंतर तुमच्या धम्म कार्यक्रमाला येणारच कोण व का ?
 ५. धम्मसेवक: काही धम्मसेवक जे नवीन येणारे प्रश्न पोहोचवतील व लोकांचे व्यवस्थापन करतील. हे ही खूप महत्वाची व्यक्ती आहे. हे जर नसतील तर लोकांचे विनम्र व्यवस्थापन कोण करणार? धम्माद्वारे इतर लोक आनंदी व विनम्र होऊ शकतात हे आपल्या स्वभावात उतरलेल्या धम्म प्रगतीद्वारेच कळेल.
६.  नोंद ठेवणारा :  एखाद्या महत्वाच्या व नेहमी येणाऱ्या प्रश्नावर धम्म तज्ज्ञाकडून जे उत्तर आले, ते लिहून घेऊन मोठया धम्म तज्ञाकडून (जसे विपश्यना विशोधन विन्यास किंवा त्यांचे विपश्यना आचार्य ) पत्रव्यवहाराद्वारे खात्री करून घेणारा. 

विभाग ७:
१. प्रत्येक प्रश्नोत्तराच्या सत्रानंतर श्रोत्यांची फीडबॅक /प्रतिक्रिया फॉर्म भरून घ्यावेत जसे


नोंद : 
१. वेगळ्या अध्यक्षाची गरज मुळात नाही, कारण नियंत्रक आहे. 
२. पाली-हिंदी /मराठी डिक्शनरी सोबत असले कि खूप लाभ होईल. 


आशा आहे कि हे मार्गदर्शन लोकाभिमुख प्रश्नोत्तराच्याद्वारे नियमित धर्मचर्चेचे आयोजन व नियोजन प्रणाली विकसित करण्यासाठी उपयोगी होईल.धर्मचर्चेला उचित उत्साह व व्यवस्थापन मिळेल अशी अशा बाळगुन सध्दर्माच्या प्रगती प्रथात काही शंका राहणार नाही ह्या आशेसह लेख पूर्ण करीत आहे.

ह्या लेखावर काही प्रश्न, सुधारणा  व सल्ला असल्यास जरूर कळवावे



सर्वांचे मंगल होवो, कल्याण होवो. 

संबोधन धम्मपथी 
मोबाइल: ९७७३१००८८६