प्रश्न: उपासकाने भिक्षु चे पाय धुवावेत का? ह्या फोटो प्रमाणे ?
उत्तर:
बुद्धांनी उपासकाला भिक्षुचे पाय धुवायला सांगणे ही तर खुप दुर ची गोष्ट, बुद्धाने त्या काळातही अनावश्यक आदर/थाट, अनावश्यक खर्च व अनावश्यक सत्कार ही थांबवलेला होता.
पहिली घटना:
तथागतांनी बोधिराजकुमाराने केलेला अनावश्यक खर्च व अनावश्यक सत्कार मौन राहुन नाकारला
कौशांबीचा राजकुमाराने राजमहालात भगवंताला भिक्षु संघासहित बोलावले असताना, महालाच्या पायऱ्यावर भगवंतांच्या स्वागताठी पांढ-या शुभ्र पायघड्या घातल्या होत्या. अनेक वेळा महालात यायची विनंती करूनही भगवान तिथेच पायघड्याच्या बाजुला शांत उभे राहिले. भिक्षु आनंद भगवंताचा आर्य-विनय / धर्म-विनय ओळखून होते, त्यांना याचे कारण कळाले.
तेव्हा भिक्षु आनंद म्हणाले, भावी काळातील जनतेला जमणार /पटणार नाही अशा रुढी भगवंताला ठेवायच्या नाही. ही भावी जनतेवर अनुकंपा(दया बुद्धी) आहे. तुम्ही राजकुमार आहात, जो खर्च तुम्हाला शक्य होईल ते इतर सामान्य माणसाला /गोर-गरीबाला पेलवणार नाही. त्या पायघड्या हटवल्या नंतरच तथागतांनी महालात प्रवेश केला. अशा प्रकारे भगवंताने त्या पायघड्या "अनावश्यक आदर" आहे, असे भिक्षु आनंदाद्वारे सांगुन काढायला सांगितल्या होत्या.
दुसरी घटना:
भगवतांनी परिनिर्वाणाची घोषणा केल्यावर अनेक भिक्षु भावुक होत भगवंताची पुजा करू लागले. यावर तथागतांनी प्रेमाने समजावले कि, फुले-हारांनी बुद्ध पुजा ही तथागताला अभिप्रेत अशी नाही. बुद्ध म्हणाले माझी पुजा तशी होत नाही.
ईमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पुजेमि!!
भाषांतर: ३६ बोधिपक्षिय अनुधम्म/उपधम्म यांचे उत्तम शिक्षण व पालन करीत, मी तथागतांना वंदन करीत आहे..
असेच मार्गदर्शन त्यांनी भिक्षू तिस्स च्या आचरणाकडे सुचना देत भिक्षूंना समजावले.
"जो माणुस धम्म-अनुधम्म/उपधम्म (म्हणजे पारमिता, बोध्यंग, स्मृती, सम्यक प्रधान इत्यादी ३६ बोधिपक्षिय अनुधम्म यांचे उत्तम शिक्षण व पालन करतो, तो माझी पुजा करतो."
संदर्भ: धम्मपद अट्ठकथा २.१५५ तिस्सथेरवत्थु
तिसरी घटना:
आरद्ध वीरिये पहितत्ते, निच्च मी दळ्हपरक्कमे।
समग्गे भालके पस्स, जतन बुद्धानवन्दनं।।
फुले हारांनी बुद्ध पुजा होत नसते. या श्रावकांना पाहा, जे समग्रपणे पराक्रम करीत (निरंतर विपश्यना ध्यान ) मनविशुद्ध करीत आहेत. तीच खरी वंदना.
संदर्भ: थेरी अपदान २.२.१७१
चौथी घटना:
राजा प्रसेनजितला भगवंतांनी "धम्म काये"ला वंदन करण्यास सांगितले, "रूपकाये"ला नाही!!
वयाच्या ८०व्या वर्षी कोशलराजा भगवंतांना वंदन करताना त्यांच्या पायांचे चुंबन घेतले होते. त्यावर भगवतांनी त्यांना विचारले, "काय झाले महाराज? या शरीराविषयी एवढा आदर व असा विचित्र सन्मान का व्यक्त करीत आहात?" यावरून हे दिसते कि, भगवंताला असा आदर विचित्र व अनावश्यक वाटतो. महामानवाच्या गुणांना समजुन ते धारण करणे, हाच खरा आदर व सत्कार आहे; धर्म पालन करण्याबाबत बुद्धांची हि तीच अपेक्षा आहे. बाकीचे अवडंबर/कर्म-कांड करण्यात काही लाभ नाही, उलट हानीच आहे.
धारण करें तो धरम हैं, वरना कोरी बात ।
सुरज उगे प्रभात है, वरना काली रात ।।
(विपश्यना आचार्य गोयंकाजी )
बुद्धांनी अहंकार कमी करण्यासाठी अनेक नियम भिक्षु संघाला बुद्धाने आहेत. मागील लेखात धुतांगधारी महाकाश्यपपांबद्दल मी संगितलेलं आहे.
उपासकांना पाय धुवायला सांगितल्याने भिक्षुंचा अहंकार वाढुन भिक्षुंची हानीच होईल. पाय धूवायला सांगणे हा तर भगवंताला अभिप्रेत असलेला बंधुभावही नाही आणि समाजसेवेची/कर्तव्याची भावना (........ बहुजन हिताय बहुजन सुखाय , लोकानुकंपाय) तर नाहीच नाही. खुपचं अशोभनीय व दुर्दैवी आहे असे वर दिलेल्या ऐतेहासिक प्रसंगावरून स्पष्ट होते.
आजकाल आपल्याला त्रिपिटक आचार्य डॉ . धर्मरक्षित, महापंडित राहुल सांकृत्यायन, डॉ . जगदीश महाथेरो, महाथेरो आनंद कोशल्यायन अशा अभ्यासु, महापंडित व सेवाभावी भंतेची गरज असताना, असे पाय धुण्याची अपमानजनक किंवा अंधश्रद्धा वाढवणारी वागणुक देणारे भंतेजी दिसतात हे क्लेशदायक आहे. यावरून हे ही दिसते कि बुद्धवाणीचा पुरेसा अभ्यास नाही. मनोरंजनाचे साधने जरा कमी करत, समाजानेही बुद्ध वाणीचे वाचन केल्यास खूप फायदा होईल.
जो भिक्षू (सध्दर्मात) स्वतःला प्रेरित करतो, आत्मपरीक्षण करतो,
तो स्वतःची रक्षा स्वतःच करीत, स्मृतिमान भिक्षू (साधक) सुखपूर्वक विहार करील !!
संदर्भ : धम्मपद ३७९
भगवान बुद्ध आणि त्यांचा ऐतिहासिक संघ (भिक्षु-भिक्षुणी, उपासक-उपासिका) यांचे गुण आणि सामाजिक कर्तव्याचे भान हे खुप प्रेरित करणारे व जीवनाला उभारी देणारे आहे. त्रिपिटकातील ऐतिहासिक सत्यकथांचा अभ्यास केला तर ते स्पष्ट होते. अशा कथा/गाथा हिंदीतही उपलब्ध आहेत. इथे क्लिक करा मज्झिम निकाय व धम्मपद
अभ्यासु व समाजसेवी बुद्धांच्या संघाला वंदन करतो व अशी अशोभनीय वागणुक दिसणार नाही याची आशा करतो.
संबोधन धम्मपथी
९७७३१००८८७
No comments:
Post a Comment