Sunday, 5 July 2020

उपोसथ परंपरेचा इतिहास व महत्व

वाचकहो,  बुद्धानुयायी लोकांमध्ये उपोसथ या परंपरेचे खूप आहे. चला, आज उपोसथबद्दल काही माहिती पाहूया !!
खात्रीलायक माहितीसाठी संदर्भ हे लेखाखाली दिलेले आहेत.  

उपोसथाचा इतिहास : 
पोसथ या शब्दाशी मिळताजुळता अथवा जोडलेला शब्द आहे, उपोसथ . पोसथ या शब्दाचा अर्थ आहे, उपवास करणे -उपाशी राहणे!! पण बुद्धवाणीत  उपोसथ या शब्दाचा अर्थ आहे, 'मुळ/गर्भित  अर्थाचे स्पष्टीकरण करणे".  कोणाद्वारे?   स्थानीय भिक्षूंची निर्वाणप्राप्तीच्या नियमांविषयी छोटी परिषदे द्वारे !

ह्या प्रथेचे दोन प्रमुख उद्देश्य आहेत, 
१. बुद्धांच्या संघातील भिक्षुंचे संबंध स्नेहाचे व मजबूत व्हावे (संदर्भ १)
२. "दुषित मनाची विशुद्धी"(संदर्भ १,४)  !! बुद्धकालीन राजा बिंबिसार यांच्यामुळे ती प्रथा सुरु झाली (संदर्भ-१). तसेच मगरमाता विशाखेलाही भगवंतांनी उपोसथ चांगल्याप्रकारे समजावून सांगितलेला आहे. (संदर्भ-४).

साधारणतः दोन आठवड्यातून भिक्षुंच्या द्वारे भिक्षुंच्यासाठी सद्धर्माविषयी, विनय नियमांविषयी आणि प्रतिमोक्षाच्या (निर्वाणप्राप्तीच्या २२७ नियमांची संक्षिप्त आवृत्ती ) बाबतीत घेण्यात येणारी जाहीर स्थानीय सभा. जेणेकरून बुद्ध वाणी विषयी उजळणी तसेच शंकांचे निरसन करता येईल. (संदर्भ-१). उपोसथच्या अंमलबजावणीच्या परिषदेसाठी चार भिक्षु व परिशुद्धी(संदर्भ-३)च्या परिषदेसाठी किमान दोन भिक्षु वैयक्तिक रित्या उपस्थित राहणे आवश्यक होते. जर चार नसतील तर किमान दोन तरी असावेत. (संदर्भ-२)

त्यावेळी उपोसथ पूर्ण करण्यासाठी एक मर्यादित व ठराविक सीमा ठरवली जात असे. जसे जागेच्या सीमेसाठी एखादी टेकडी, लाकुडाची खूण-झाड, नदी अथवा वारुळ! अशा प्रतिकांद्वारे ओळखली जाणारी ठराविक जागा. जर तशी  प्रतीकानी ओळखता येणारी ठराविक जागा  नसेल तर त्याच गावात जिथे भिक्षु निवास करतात ती मर्यादित जागा ठरवली जायची. (संदर्भ-१)

भगवंतांनी उपोसथात काय सांगितलेले आहे :

त्रिपिटकातिल अंगुत्तर निकायात (०३.०७०) मुलोपोसथ (मुळ-उपोसथ) सुत्त आहे!! त्यात भगवंतांनी मिगारमाता  विशाखेला उपोसथ करण्याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले आहे. त्यात भगवंतांनी सांगितले कि उपोसथ किती प्रकारचे असतात व श्रेष्ठ उपोसथ त्यालाच  म्हणावे ज्याने, मनुष्याच्या मनातील अशुद्धता नष्ट होते व निर्वाणाच्या पथावर प्रगती होते.  त्यासाठी एक वेगळा लेख लिहिणार आहे. तोवर ह्या ठिकाणाचा इंग्लिश लेख वाचावा. 


आधुनिक काळातील उपोसथ :

योजना :
  • आजच्या काळात गृहस्थ व भिक्षु संघ दोघेही सद्धर्माबाबत जागरूक व सजग राहून मनातील विकार (आसक्ती-द्वेष-मोह जसे कामवासना, अहंकार, तिरस्कार, ईर्षा-मत्सर, भीती, चिंता पश्चाताप, बैचेनी ) दूर करण्यासाठी सामुहिक  ध्यान, वाचन व धम्म चर्चा करत मनःशुद्धी करतात. एकमेकांना धम्मात प्रवीण होण्यासाठी प्रेरणा देतात. 
  • उपोसथाचा दिवस हा  पौर्णिमा,अमावस्या, कृष्ण अष्टमी , शुक्ल अष्टमी या  दिवशी योग्य ठिकाणी भेटून धम्मात विकास करण्यासाठी साजरा करतात. कारण उपासक-उपासकांना कौटुंबिक कामामुळे धम्म व्यवस्थित व नियमित शिकण्यास कठीण जाते. कारण ते  भिक्षु -भिक्षुणी सारखे पूर्ण वेळ विपश्यना साधना किंवा धम्म अभ्यासात वेळ  देऊ शकत नाही.
  • त्यामळे आठवाड्यातील किमान एक तरी दिवस जो  पौर्णिमा,अमावस्या, कृष्ण अष्टमी , शुक्ल अष्टमी या  दिवशी येतो त्या दिवशी गंभीर साधना करावी,  भिक्षु -भिक्षुणी किंवा वरिष्ठ गुरु बंधू सोबत धम्म चर्चा करावी व एखाद्या  भिक्षु -भिक्षुणी सारखे आयुष्य जगावे अशी अपेक्षा आहे. 
  • काही जण तर अधिक काळ जवळच्या बुद्धविहारात धम्म ज्ञान/प्रवचन मिळवत व धम्म चर्चा करत पूर्ण करतात.  उपासक-उपासकां उपोसथाच्या दिवशी अधिक सजग व जागृत राहून पूर्ण दिवस धम्म अभ्यास करीत, धम्म प्रवचन ग्रहण करीत, धम्म चर्चा करत असतात, त्यांच्या क्षमतेनुसार. 
  • जर आसपास भिक्षु असल्यास, उपोसथाच्या दिवशी भिक्षुला भोजनदान दिल्याशिवाय उपासक /उपासिका भोजन करीत नाही . पूर्ण आठ शील त्या एका दिवस व रात्री साठी ग्रहण करण्याची शपथ घेतात
उपोसथाचे अपेक्षित परिणाम :
भिक्षु-भिक्षुणी सारखे  आयुष्य जगावे अशी अपेक्षा का आहे?
व्यक्ती आयुष्य  जगताना बऱ्याच वेळा आठ लोकधर्मांचा (सुख-दुःख, फायदा-तोटा, निंदा-स्तुती, यश-अपयश) विपरीत परिणाम होऊन दुखी होतो. ऐनवेळी परिस्थितीला सामोरे कसे जायचे याचे उत्तर नसल्याने स्वतः दुखी-बैचेन होतो व परिवारासह सर्व आप्त-स्वकीयांना दुःखी-बैचेन करून टाकतो. त्यामुळे मानवी मनाचा हा नित्य स्वभाव ओळखून त्यावर योग्य व स्थायी (पर्मनंट ) औषध शोधणे हे शहाण्या माणसाचे लक्षण आहे. 


जीवन हे तर १)अनित्य (नेहमी बदलते ), २) अनात्म (माझी मालकी असलेले (कर्म सोडून) काहीच नाही व ३)दुःख (जन्म- मृत्यू, प्रिय/ घटनेचा व्यक्तीचा वियोग , अप्रिय व्यक्ती/घटनेचा संयोग , आजारपण , गरिबी , अनिश्चितता, अनपेक्षित अपयश/तोटा/अपमान ) याने भरलेले असल्यमुळे धम्मा  शिवाय दुःखमुक्तीचा मार्ग नाही हे अनुभवाने शिकण्यासाठी भिक्षु-भिक्षुणी सारखे (म्हणजे सुखसोयींचा व नातलगांच्या अभाव असणारे पण मनाच्या  चंचलतेला/बेधुंदीला नियंत्रित करणारे) आयुष्य जगत असताना  मी पणा व इतर भ्रमातून मुक्ती मिळवणे अपेक्षित आहे. 


आदर्श व जबाबदार भिक्षु हे नेहमी अष्टशील पालन करणारे, ध्यानमार्गी  व एकासनी (दिवसातुन एक वेळच जेवणारे ) असे असतात. त्यामुळे साधारण उपासकाला नेहमीच्या पंचशीलांसोबत बाकीचे तीन शील (खाली दिल्याप्रमाणे)असे एकूण आठ शील धारण करावे लागतात. असे भिक्षु (अथवा धम्मप्रगत उपासक-उपसिका)   अध्यात्मिक/पारलौकिक शांतीचे उदाहरण बनून, अन्य उपासक-उपसिकांना धर्मात प्रवीण होऊन जीवनात सुखी होण्याची नवीन  ऊर्जा देतात


नवीन तीन शिलांचे फायदे :
१) एकदाच व दुपारी १२ च्या आत जेवींन (विकाल भोजना वेरमणी )  (एकाच वेळेला जेवल्याने आळस दूर होऊन उत्साही पद्धतीने ध्यान करता येते, व शरीर स्थूल होत नाही. जेवणात संयम बाळगणे शक्य होते. )
२) संगीत, नाच-गाणे, नाटक-कला (स्पर्धा-खेळ) पाहणे , सुगंधी द्रव्ये-पुष्पमाला, सौन्दर्य प्रसाधने, दागदागिने वापरणार नाही.  (जे शरीराचे अनित्यबोधी गुणधर्म लपवण्यासाठी व पैसा-पाणी-संपत्ती मिरवण्यासाठी वापरले जातात तसेच विषयवासना, अनैतिक संबंध व जीवनातील महत्वाच्या प्रश्नांपासून तात्पुरता विरंगुळा/मनोरंजन/कल्पनाविलास  मिळवण्यासाठी पाहिले जातात  )
३)  उंच शय्या/महाशय्या  (शयनासन ) वापरणार नाही. ( साधे जीवन जगण्याची प्रेरणा, ऐहिक सुखांच्या शिवाय पारलौकिक सुखाचा अनुभव, साधेपणातून मिळणारा अध्यात्मिक आनंद मिळवण्यासाठी उपयोग होतो)

तीन प्रकारचे उपोसथ:
उपोसथच्या ध्येयानुसार तथागतांनी तीन प्रकारचे उपोसथसांगितले आहेत. 
१) गोपालक उपोसथ: गोपालकाचे असे नियोजन असते आज गायी-गुरांनी अमुक चारा अमुक ठिकाणी खाल्ला आहे; उद्या तमुक ठिकाणी तमुक प्रकारचा चारा खायला देऊया . त्याच प्रकारे असे उपोसथ पाळणारे असतात आज माझा उपवास आहे व आज अमुक दिन आहे म्हणून, मी आज अमुक प्रकारचे भोजन करणार (व स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेणार )  

२) निर्ग्रंथ-जैन लोकांचा उपोसथ : (मी भाषांतर करणारा लेखक धम्मपथी,  जैन लोकांप्रती आदरासहित एका इंग्लिश वेबसाईट वरील मसुदा मांडत आहे) निर्ग्रंथ म्हणतात कि, "हे गृहस्थानो दंड देणे सोडा! चारही दिशेतील १०० वर्षे जगणाऱ्या व्यक्तींसाठी दयाबुद्धी व करुणा  दाखवा" पण त्यांची करुणा व दयाबुध्दी हि सर्वव्यापी/सर्वासाठी नसते. तसेच ते म्हणतात, "गृहस्थानो, अंगावरील  वस्त्रे सोडून द्या! आता बघा इथे असे काहीच नाही जे कोणाचे आहे व माझे असे काहीच नाही. (कारण मी सर्व  सोडलेले आहे, कपडे ही !)" तरीही मी  कोण, माझे पालक-नातेवाईक कोण, माझी पत्नी-मुले, माझे सेवक-दास अमुक असे सर्व ते लक्षात ठेवतात!! तसेच त्यांचे पालक, सेवक-दास  व नातेवाईकही असे त्यांच्याबद्दल लक्षात ठेवतात! अशा प्रकारे ते सत्याकडे  मन वळवण्याचा प्रयत्न करतात, पण ते भ्रमाकडे मन वळवितात. तसेच रात्री अशा वस्तूंचा उपभोग घेतात, जे त्यांना  दिलेले नसतात.  तथागत म्हणता, कि हा चोरीचा प्रकार आहे.

३) आर्य (महान) उपोसथ : जेव्हा लोक जीवन्मुक्त-अरिहंत संबुद्धाचे शब्द आठवून मन उल्हसित करतात व विकारांना ओळखतात तेव्हा ते मनाच्या शुद्धीबाबत प्रेरित होतात. पहिले अंग धर्माचे शील पालन करीत विविध  दुष्कर्माबाबत अधिक माहिती घेत दुष्कर्मांपासुन अलिप्त राहतात. दुसरे अंग धर्माचे, समाधि (कुशल चित्ताची एकाग्रता) ठेवीत मन शांत व सयंमी कारण्याची विद्या शिकतात. तिसरे अंग प्रज्ञा, जिच्यामध्ये अंतर्मनातील सर्व अकुशल विचारांना कारणीभूत असलेले संस्कार (म्हणजे दोन्ही दूषित विचारांचा शरीरावर परिणाम व दूषित विचार) टप्याटप्याने समूळ नष्ट करण्याची विपश्यना विद्या शिकतात. अशा प्रकारे धर्म चर्चा, धर्म नियमांची माहितीची उजळणी व सामूहिक विपश्यना साधना करीत चित्त निर्मळ करतात.  मनाच्या विशुद्धी बाबत योग्य, यशस्वी निष्कलंक  व अनेकांना लाभ देणारी टेक्नीक (आर्य अष्टांगिक मार्गा) चा वापर करून मन निरोगी ठेवतात, असा उपोसथ हा परिपूर्ण व कल्याणकारी असतो. त्याला आर्य उपोसथ अथवा ब्रह्म उपोसथ (ब्रह्म विहारी आचरणाचा) सुद्धा म्हणतात!!


भगवंतांनी तिसऱ्या प्रकारच्या उपोसथाला परिपूर्ण व सुयोग्य उपोसथ घोषित केले आहे. 

मंगल व्हावे!
- संबोधन धम्मपथी 

संदर्भ 
२. महावग्ग 
३. परिशुद्धी : गौतम बुद्धाच्या काळात शील पाळण्याबाबतच्या व कायदेशीर दंडप्रक्रियेबाबतची  परिशुद्धी हि एक अत्यंत महत्वाची सभा होती . प्रतिमोक्षाच्या नियमांचे उजळणी/पठाण करण्यापूर्वी प्रत्येक भिक्क्षुने जाहीर प्रतिज्ञा करणे गरजेचे होते कि, 'मी प्रतिमोक्षाच्या एकाची नियमाचे उल्लंघन केलेले नाही'. त्यानंतरच प्रतिमोक्षाच्या नियमांची उजळणी व्हायची. हे सर्व मात्र स्थानिक भिक्षूंच्या समोरच व्हायचे. 
४. मुलोपसथ सुत्त (मुळ-उपोसथ सुत्त, मिगारमता विशाखेला उपोसथाची पद्धत समजावून सांगितलेली आहे   ), अंगुत्तर निकाय (इंग्लिश आवृत्ती :  https://www.accesstoinsight.org/tipitaka/an/an03/an03.070.than.html)
५. उपोसथ सुत्त : इथे भिक्षूंना धम्म व विनयाची विशेषतः समजावून सांगितलेली आहे )  -https://www.accesstoinsight.org/tipitaka/kn/ud/ud.5.05.than.html
६. उपोसथवरील लेख व संदर्भ  https://www.accesstoinsight.org/ptf/dhamma/sila/uposatha.html







No comments:

Post a Comment