तिरोकुंड सुत्त : (चार) भिंतीपलीकडील अदृश्य उपाशी सावल्या
ह्या लेखात मी तिरोकुंड सुत्त आणि त्यावरील स्पष्टीकरण देत आहे.
बुद्धाने हितकारी/श्रद्धा आणि अहितकारी/अंधश्रद्धा गोष्ट कशी ओळखायला शिकविले ?
हे सुत्त त्रिपिटकातील खुद्दकनिकायात प्रेतवत्थु (प्रेतवस्तु ) विभागातील आहे. ह्या विभागात भगवंतांनी अकुशल कर्म करुन प्रेतयोनीत गेलेल्या लोकांची व्यथा व दुर्दैवी स्थिती समजावली आहे. अर्थात, यावर अनेकांचा विश्वास बसणे कठीण आहे. तरी पंचतंत्रासारख्या मनोरंजक कथांतुन जसे आपण बोध / सद्गुण घेतो आणि आपले भले करतो तसे आपण आपले भले साधावे. स्वतः बुद्धांनी कालाम सुत्तात स्पष्टपणे सांगितले आहे कि, "मी सांगतो म्हणुन किंवा ग्रंथांत लिहिले आहे म्हणुन मानु नका. जर सर्व समाजाचे भले होत असेल आणि विद्वानांनी स्वीकारले असेल किंवा तुम्ही स्वतः तपासले असेल तरच ते माना ! नाहीतर एक कथा म्हणुन एका आणि सोडून द्या."
आणखीन सांगायचे म्हणजे कॉम्पुटर बनवायचे ज्ञान ५० वर्षांपूर्वी एखाद्याला सांगितले तर अशी वस्तु बनू शकते, यावर कोणी श्रद्धा/विश्वास ठेवला नसता! आज ती वस्तु बघितल्यावरच श्रद्धा/विश्वास बसतो. तरीही वाचकाने कालामसुत्तच लक्षात ठेवावे !!
प्रेतवस्तुची विभागाची ओळख : तुमचे काही मृत पूर्वज आणि प्रिय मृत नातेवाईक मृत्यूनंतर प्रेतयोनीत जन्मुन खूप दुर्दैवी आयुष्य जगण्याची शक्यता आहे. मृत्यूनंतर प्रेतयोनीत अशीच माणसे जातात ज्यांनी घोर अकुशल कर्म केलेली आहेत. (कर्म सिद्धांतानुसार) तिथे ते स्वतःला घोर शिक्षेच्या संकटांपासून व उपाशी रहाण्यापासून वाचवु शकत नाही. म्हणुन बुद्ध समजावतात, तुम्ही मृत पुर्वज/नातलगांबद्दल (तुमच्यासाठी त्यांनी केलेल्या कामाबद्दल) विनम्र राहुन आणि कृतज्ञता बाळगुन, त्यांची भल्यासाठी आणि तुम्हाला जास्त काळ साथ देईल असे पुण्य/मंगल करण्यासाठी दान देत राहिले पाहिजे.
(तिरोकुंड सुत्त सुरु झाले)
तिरोकुंड सुत्त: त्या भिंतीपलीकडील अदृश्य उपाशी सावल्या
(तिरोकुंड म्हणजे घराबाहेरील)
घराच्या बाहेर किंवा चौकात ते अदृश्य ( मृत पावलेले पुर्वज/नातेवाईक ) उभे आहेत! दाराच्या चौकटीत ते उभे आहेत, ते त्यांच्या जुन्या घरी परतण्याच्या प्रयत्नात आहेत. पण स्वतःला आणि कुटुंबाला जेव्हा भरपूर अन्न-पाणी मिळते, तेव्हा कोणीही त्यांना (स्वतःच्या पूर्वजांना) लक्षात ठेवुन धन्यवाद देत नाही. असे प्रत्येक मनुष्याच्याचे कर्म/स्वभाव (दोष) आहे.
तरी अशा प्रकारे ज्यांना स्वतःच्या मृत पुर्वज/नातेवाईकांबद्दल सहानुभूती वाटते, ते इतरांना वेळेवर योग्य अन्न-पाणी किंवा विविध प्रकारे वेळेवर दान कृतज्ञतेने देतात. दान देताना असा विचार असतो, कि, "आज आम्हाला आमच्या मृत पुर्वज/नातेवाईकांच्या कष्टामुळे सुख समाधान मिळते आहे. (हे सुंदर छान वस्तूचे दान देताना) आम्ही कृतज्ञतेने अशी कामना करतो कि, ह्या दानाच्या पुण्याने मृत पुर्वज/नातेवाईक जिथे असोत, तिथे त्यांनाही योग्य अन्न-पाणी किंवा विविध प्रकारे मदत मिळो. आमचे मृत पुर्वज/नातेवाईक सुखी होवोत!"
आज संयोगाने जे मृत पुर्वज/नातेवाईक इथे अदृश्यरित्या जमले असतील त्यांना विनंती कि, "आम्ही इतरांना दिलेल्या (छान आणि भरपूर अन्न-पाणी किंवा इतर विविध ) दानाबद्दल तुम्ही (मृत पुर्वज/नातेवाईक) आम्हाला प्रेमाने-कौतुकाने आशीर्वाद द्यावे !! तुम्ही आम्हाला असा आशीर्वाद द्व्यावा कि , "आम्हाला (मेलेल्या नातेवाईकांना ) विविध गोष्टी सन्मानपूर्वक दान करणाऱ्या ह्या जिवंत नातेवाईकांना सुख-शांती व दीर्घायुष्य लाभो! ज्यांच्यामुळे आम्हाला [ही भेट] मिळाली आहे. आमचा (मृत्युनंतरही) सन्मान झाला आहे. अशा प्रकारे दान करणाऱ्याचे नेहमी खुप मंगल होते! तसे तुम्हा सर्वांचेही होवो!"
हे लक्षात घ्यावे कि, जिवंत असताना केलेल्या अकुशल कर्मामुळे मृत्युनंतर प्रेतयोनी मिळते. ह्या प्रेतयोनीत शेती नसते, गाया-गुरे नसतात, कुठलाही व्यवसाय नसतो, पैशाचेही व्यवहार नसतात! जे काही दान त्यांचे जिवंत नातेवाईक (इतर गोर-गरीब-गरजु लोकांना) देतात, तेच दान मृत पुर्वज/नातेवाईकांना प्रेतयोनीत मिळते. ते नाही मिळाले कि, हे अदृश्य प्रेतप्राणी खुप व्याकुळ-अशांत-बैचेन होतात.
जसे पावसाळ्यात डोंगरांवर पडलेले पाणी, झिरपत-झिरपत कळावे बनुन दरीतुन खालच्या गावांना मिळते, त्याच प्रकारे इथे जिवंत माणसांना केलेली मदत त्या प्रेतयोनीतील मृत पुर्वज/नातेवाईकांना मिळते.
त्याचप्रमाणे पाण्याने तुडुंब भरलेल्या नद्या जेव्हा समुद्राला मिळुन विशाल बनवतात त्याच प्रकारे, इथे जिवंत माणसांना केलेली मदत त्या प्रेतयोनीतील मृत पुर्वज/नातेवाईकांना मिळते.
"भूतकाळात ते माझे मृत पुर्वज/नातेवाईक, सोबती, मित्रांनी मला दिले, माझ्या वतीने काम केले होते." असे मृत पुर्वज/नातेवाईकांनी केलेल्या उपकारांची जाण ठेऊन कृतज्ञ मनाने आदरपुर्वक दान करतात. अशा प्रकारे त्यांच्या पूर्वजांच्या चांगल्या कामाला चांगल्या कामानेच प्रतिसाद देतात.
जीवंत माणसे कितीही रडली, दुःख किंवा शोक केला तरी, कुठल्याच प्रकारे मृतांना फायदा होत नाही.
पण जेव्हा मृत पुर्वज/नातेवाईकांनी केलेल्या उपकारांची जाण ठेऊन,कृतज्ञ मनाने आदरपुर्वक बुद्धाच्या संघाला दान करतात तेव्हा मृतांना तात्काळ फायदा होतो आणि तो दीर्घकाळ त्यांना सोबत असतो.
(तिरोकुंड सुत्त समाप्त )
स्पष्टीकरण तिरोकुड्ड सुताचे :
खुप स्वाभाविक आहे कि असे सुत्त वाचुन विज्ञानाची कास न सोडणाऱ्या बुध्दवाणी बद्दल असंतोष किंवा भीती किंवा दोन्ही वाढतील. म्हणुन अशा प्रकारचे सुत्त खुप विद्वान माणसाने फक्त अशा लोकानांच सांगावे ज्यांनी कालामसुत्त चांगले समजले आहे. ज्यांना कथेतील न पटलेल्या गोष्टी बाजूला ठेवून केवळ सद्गुणांवर लक्ष ठेवुन सद्गुण वाढवणाऱ्यांवर भर असतो. विज्ञान एखादी गोष्ट तेव्हाच स्वीकारते, जेव्हा आपण ती सिद्ध करु शकतो. त्यामुळे आपण प्रेतयोनी सिद्ध ना करता आल्याने, ती जरा बाजूला ठेवुन फक्त सद्गुण घेण्याचा प्रयत्न करूया.
आजच नाही तर असे बुद्ध काळातही अनेकदा झाले आहे कि, तरुण माणसे आपल्या म्हाताऱ्या आई-बापाला वाऱ्यावर सोडुन देतात. त्यांनी आमच्यासाठी काहीच नाही केले असे बोलतात. आपले पुर्वज कठीण परिस्थितीत कसे जगले, कसे लढले आणि आम्हाला चांगल्या गोष्टींचा वारसा जातं करुन ठेवला, हेही विसरुन जातात.
पण विद्वान माणसाला हे नेहमी माहिती असते, कि एखाद्या उंच फांदीची उंची, त्या फांदीच्या खाली असणाऱ्या अनेक जुन्या फांदीमुळेच आहे. अगदी त्याचप्रमाणे माझे आजचे सुख हे केवळ माझ्याच नव्हे तर, माझ्या अनेक पिढीच्या मेहनतीमुळे आणि जिद्दी मुळेच आहेत. आई-वडील, काका-काकी/मावशी, मामा-मामी आणि त्या सगळ्यांचे आई-वडील, यांच्या उपकार्याच्या छायेत माझे सुख भोगीत आहेत. जर पती-पत्नी, भाऊ-बहीण जिवंत नसतील तर त्यांच्या प्रेम-चांगुलपणाने माझे जीवन बहरले आहे. हे जिवंत असोत कि मृत असोत, मी त्यांचा खुप खूप ऋणी आहे. हा विनम्रता, खरेपणा आणि कृतज्ञता हे सद्गुण असलेलाच माणूस हे कबुल करील.
आणखीन लक्ष दिले तर माझे शिक्षक, शेजारी, अन्न पिकवणारे शेतकरी, पोलीस-सैनिक दल, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक/राजकीय पुढारी, रिक्षा वाले, ट्रेन-बस बाले, वर्तमानपत्रे-पुस्तक लिहिणारे, मासेमार -मच्छिमार, व्यापारी, डॉक्टर-वार्डबॉय, प्रोफेसर, न्यायपालिका संघ, अध्यात्मिक संन्यासी, संडास-गटार सफाई कर्मचारी आणि असे असंख्य माणसे हे सर्व कोणत्याही जाती-धर्माचे असु शकतात! ते आज जिवंत असतील किंवा नसतील मी नक्कीच त्यांचा ऋणी आहे आणि राहीन. हा विनम्रता, खरेपणा आणि कृतज्ञता हे सद्गुण असलेलाच माणूस हे कबुल करील.
आता मी हे उपकार कसे फेडु ? हे जिवंत असले तरी अदृश्य आहेत, आणि मृत असले तरी अदृश्य आहेत!! त्यांना माझ्या आनंदात-सुखात कसा सहभागी करू? तर मित्रा ये... हे तिरोकुड्ड सूत्र वाच!! आणि नंतर सन्मानपूर्वक, निर्मळ मानाने आणि कृतज्ञतेने उत्तम दान कर! ते इतरांना बुद्धाने सांगितल्या प्रमाणे मिळेल!
आता प्रश्न हा कि बुद्धाच्या संघालाच दान केल्याने ते लवकर आणि जास्त काळ कसे टिकेल ?
लक्षात घ्या सुत्तात संघ हा शब्द आहे, त्यात भिक्षु, भिक्षुणी, उपासक, उपासिका चौघे हि येतात !
एखाद्याला दुसऱ्याला पैसे पाठवायचे असल्यास माणूस एकदम विकसित बैंक बघतो जी ऑनलाईन व्यवहार १-२ सेकंदात करते. मोठं व्याज पाहिजे असेल तर अशी मेहनती विकसित बैंक बघतो जी विचार पूर्वक चांगल्या ठिकाणी, चांगल्या मार्गाने खुप मेहनत करुन गुंतवलेले पैसे वाढवुन देते! बरोबर ना ?
भगवंताचा संघ ( भिक्षु, भिक्षुणी, उपासक, उपासिका) हे अशीच विकसित बैंक आहे. ते स्वतःला दिवस रात्र चांगल्याकामात (सत्य, न्याय, सन्मार्ग, निरंतर व निस्वार्थ लोकसेवा) गुंतवतात. विचारपूर्वक चांगल्या ठिकाणी, चांगल्या मार्गाने, खुप मेहनत करुन मन शुद्ध करतात, सदाचारी बनतात, विपश्यना ध्यान करीत मनाचा खूप उज्ज्वल विकास साधतात. ते कोणतीही जात-धर्म ना पाहता निस्वार्थ आणि सेवाभावी वृत्तीने लोककल्याण करीतच ते विकसित गुणवान मानव होतात. जसे पैशाचे काम एका सजग, उच्च शिक्षित, प्रामाणिक, मेहनती आणि सद्गुणात रमणाऱ्या माणसालाच मिळते, त्याच प्रमाणे भगवंताचा संघ ( भिक्षु, भिक्षुणी, उपासक, उपासिका) हे अशीच विकसित बैंक आहे जी सदासर्वदा मेहनती व कल्याणकारीच कामे करते. त्यामुळे संघाच्या ह्या चारही खांबांचा उचित आदर आणि सत्कार व्हावा . कां हि कल्याणकारी कामे करताना शील, सत्य, अखंड मैत्रीआणि सहनशीलता ह्या पारमिता पूर्ण केल्यानेच तो माणुस संघाचा भाग बनतो, भले मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असो!! एखादे कर्मकांड केल्याने, विशिष्ट कपडे घातल्याने, विशेष भाषा बोलल्याने किंवा विशेष केस रचना केल्याने नाही!! (संदर्भ : धम्मपद, भिक्षु वर्ग )
नोट : तिरोकुड्ड चा अनुवाद मी खालील इंग्लिश वेबसाईट चा आधार घेऊन केला आहे. ह्या वेबसाईट च्या सौजन्याबद्दल आणि मेहनती बद्दल खुप खुप धन्यवाद।।
https://www.accesstoinsight.org/tipitaka/kn/pv/pv.1.05.than.html
खूप खूप धन्यवाद !
आशा आहे कि ह्या लेखाने खूप सारे अकुशल विचार किंवा धारणा दूर होतील!
सर्वांचे मंगल होवो!
संबोधन धम्मपथी
मोबाइल : ९७७३१००८८६ (व्हाटसप )
No comments:
Post a Comment