Saturday, 4 November 2023

सामाजिक सलोखा व बंधुत्व राखुन प्रबोधन


सामाजिक सलोखा व बंधुत्व राखुन प्रबोधन  

दिनांक : ५ नोव्हेंबर २०२३


आदरणीय अध्यक्ष, 

प्रज्ञासुर्य मित्र मंडळ 

मुलुंड पुर्व 

विषय : तुमच्या कार्यक्रमांसाठी धन्यवाद व अभिप्राय 

आदरणीय महोदय,

मी आयु संबोधन अशोक धम्मपथी, एक उत्सुक व सजग बुद्ध अनुयायी आहे. या पत्राद्वारे प्रज्ञासुर्य मित्र मंडळाच्या कार्यक्राचे मी अभिनंदन व धन्यवाद देत आहे. 

तुमच्या गेल्या दोन कार्यक्रमांना (भीम जयंती व अशोक विजयादशमी) मी उपस्थित होतो. त्यातुन अपेक्षित लाभ न होता, मन अप्रसन्न झाले. हे व्यक्तिगत मत तुमच्यापर्यंत पोहोचवणे मी माझे कर्तव्य समजतो.म्हणुन  मी विनम्र विनंती करतो कि, माझा अभिप्राय तुम्ही कृपा करून ऐकून घ्यावा. 

ह्या पत्राच्या पहिल्या भागात उद्भवलेले कटु प्रसंग व दुसऱ्या भागात त्यावरील उपायही सुचवत आहे. 

भाग पहिला : कटु प्रसंग 

१.१ पहिला प्रसंग- भीम जयंती : ह्या कार्यक्रमाला मी हजर होतो. संगीत, निवेदन व डेकोरेशन छान होते.  पण जो  वक्ता बोलायला आले होते, तो महत्वाचा मुद्दा आहे. कारण भीम-स्मृतीचे कार्यक्रम हे मुख्यत्वे प्रबोधनाचे व ज्ञान प्रसाराचे असावेत म्हणुन सर्वात महत्वाचे वक्ता आणि त्याचे प्रबोधन!! 

नियोजित वक्त्यांनी बासाहेबांच्याबद्दल (अगोदरच माहिती असलेले) मुद्दे  जसे हिंदु कोड बिल व स्त्रियांसाठी शिक्षण /वारसा हक्क असे काही मुद्दे मांडले होते. ते बाबासाहेबांचा भक्तिभावाने गुणगौरव करीत होते. पण सांगताना त्यांनी हिंदु धर्मात (संप्रदायात) अशी तजवीज नव्हती, हिंदु धर्मात अमुक नव्हते-तमुक नव्हते बोलत होते.. समाजात रूढी परंपरा व जातीआधारित व्यवस्था होती अशी वाक्ये हिंदु संप्रदायाची नवे घेऊन असे खुल्या मैदानात सारखे बोलत होते. असे बोलण्याने बाबासाहेबांचे गुणगान होत होते, पण इतरांच्या दोषांवर बोट दाखविल्याने त्यांचा आणि त्यांच्या संप्रदायाचा खुला अपमान होतो हे भान कोणी ठेवावे ? अशाने दोन समाजात दरी निर्माण होते, हे कोणी कळवावे? 

सार्वजनिक जाहीर प्रवचन करताना सत्य जरी बोलत असाल तर, ते इतरांच्या सांघिक/धार्मिक भावना दुखावणार नाहीत हि जबाबदारी वक्त्याने घेणे हे त्याचे आद्य कर्तव्य आहे असे मला वाटते. इतिहासात महामानव काय बोलले, ते पुन्हा पुन्हा बोलण्यापेक्षा त्याच्या मार्गदर्शनाने आजच्या कुठल्या समस्या सुटणार आहेत ते आदरपूर्वक व हितकर पद्धतीने सांगणे हे महत्वाचे आहे. बाबासाहेबांनीही तेच केले होते. महात्मा फुल्यांच्या कामाचा पाढा नेहमीच सांगत  बसण्यापेक्षा, त्यांनी त्या काळच्या समस्या सोडवण्यावर भर दिलेला होता . त्यामुळे घटनेने दिलेल्या "विचार स्वातंत्र्याचा'" उपभोग घेताना  इतरांचा अपमान करीत "बंधुता" ह्या शब्दाचा अर्थ व जबाबदारी जो विसरतो तो, व्यक्ती भीमानुयायी असणे शक्य नाही. इथे प्रत्येक बौद्ध बांधवांचे अनेक हिंदु बांधव मित्र, शिक्षक, मॅनेजर व शेजारी आहेत. अशी वाक्ये बोलण्याने, हिंदु बांधवांच्या समोर बौद्ध कुठल्या तोंडाने जातील? त्यामुळे खालील प्रश्न माझ्या मनात सारखे येवु लागले :
  1. हिंदु बांधवांच्या भावना कटू शब्दाने दुखावल्या गेल्याने, सध्याचे बौद्ध लोकलज्जेसाठी स्वतःला जर अबौद्ध मानु लागले तर त्याची जबाबदारी कोणी घ्यावी ?
  2. इतिहासातील बाबासाहेबांची कर्तबगारी पुन्हा सांगण्याने आज  समाजाच्या /देशाच्या कुठल्या समस्या सुटतील हे त्या वक्त्याने सांगितले का ?
  3. बाबासाहेबांसारखा नेता कसा तयार होतो, बाबासाहेबांसारखे सद्गुण  कसे मिळवायचे  किंवा चांगले नेते आज कशामुळे भ्रष्ट होतात? हे सांगणे भीमजयंतीच्या दिवशी महत्वाचे नाही का?
  4. काही भावना  दुखावल्या गेल्याने काहींनी अप्रसन्न होऊन जर गावातल्या गरीब-दुर्बल बौद्धांवर हल्ला झाल्यास तर त्याची जबाबदारी कोणी घ्यावी ?
  5. काही भावना  दुखावल्या गेल्याने काहींनी अप्रसन्न होऊन जर नोकरीत,व्यवसायात, गावात, सोसायटीत बौद्धांना टाळु/हिणवु  लागले तर त्याची जबाबदारी कोणी घ्यावी ?

हे प्रश्न गंभीर व अनुत्तरीत असल्याने, अशा अबोध, दिशाहीन व बेजबाबदार वक्तव्याची जबाबदारी वक्त्या सोबत आयोजन कर्त्यांवर व त्या-त्या समाजावरही असते. कारण हाच समाज अशा कार्यक्रमांना पैसे देतो व कार्यक्रमाला उपस्थित राहतो. तसे आपल्याकडून नकळतही  होऊ नये हीच बौद्ध जनतेची भावना त्या कार्यक्रमातील ८०-९०% रिकाम्या खुर्च्यांची आपल्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचवली आहे. 

१.२ दुसरा प्रसंग - अशोका विजयदशमी  : ह्या दिवशी कार्यक्रमाची रूपरेषा अनियंत्रित झाली, मी स्वतः प्रमुख वक्ता होतो. आणि दिलेल्या वेळेच्या ३० मिनिटे अगोदरआलो होतो. ऑफिसला सुट्टी नसल्याने आणि कार्यक्रम वेळेत सुरु न होता लांबल्याने मी निघून आलो. त्याबद्दल क्षमस्व!!

ह्या कार्यक्रमासाठी माझाकडे दोन-अडीच तासाचाच वेळ होता व हि  अडचण अगोदरच आयु अमित केदारेना वेळेत कळवली होती. एक तास थांबूनही कार्यक्रमाची रूपरेषा बिघडली आणि तरीही मला धर्मसेवेची नियोजित संधी मिळाली नाही, तेव्हा मी निषेध करीत, प्रज्ञासुर्य मंडळाचा निरोप घेतला. 

जेव्हा  मी ४५ मिनिटांनी ऑफिसच्या कामाची तजवीज करुन जबाबदारी व शब्द पूर्ण करण्यासाठी कार्यक्रमात पुन्हा आलो, तेव्हा हिंदु समाजाचे प्रमुख चे स्थानिक नेते उपस्थित होते. त्यांच्या उपस्थित सर्व बौद्ध जनतेसमोर एक उच्च सुशिक्षित व प्रतिष्ठित स्त्री प्रवचन देत होती. दुर्भाग्यवश ती स्त्री (कदाचित अनियोजित वक्ता असल्यामुळेही )  बौद्ध लोक हिंदु सणांची व संताची आश्रय घेतात म्हणुन बौद्धांची व हिंदु सणांची व संताची निंदा करू लागली.  हि निंदा एवढी दुर्दैवी व कटु होती कि, हिंदु नसूनही मला खूप खूप वाईट वाटले!  

मी माझ्या अनेक हिंदु बांधवांचा खुप खुप ऋणी आहे. हे आपल्याला माहिती आहे कि, स्वतःच्या आईवर स्नेह व प्रेम करणारा मुलगा,  इतरांच्या आईची निंदा करत नाही. तसेच स्वतःच्या श्रद्धास्थानाला मानणारा, दुसऱ्याच्या श्रद्धास्थानाची निंदा करू शकत नाही.त्या स्त्रीला थांबवण्याची प्रबळ इच्छा झाली, पण मी स्वतः ला थांबवले. त्यानंतर प्रवचन चालु असताना १२:४५ वाजता खीरदानाचा सुरु झालेला कार्यक्रम हाच्या कार्यक्रमात व्यत्यय आणीत  होता. 

कार्यक्रमात आलेले हिंदु समाजाचे प्रमुख चे स्थानिक नेते १००% अप्रसन्न झालेले असणार यात मला तिळमात्र शंका नाही. पण त्यांनी सामंजस्याने घेतले, पण तिचे भाषण आवरल्यावर विनम्रपणे सभात्याग केला व निरोप घेतला. 
 खालील प्रश्न माझ्या मनात सारखे येवु लागले :
  1. हिंदु बांधवाना सन्मानपूर्वक बोलाऊन त्यांचा अपमान करणे हे बौद्धांचे कर्तव्य व हक्क आहेत का?
  2. त्यांचा अपमानावर  त्या वक्त्या, आयोजक व बौद्ध समाज  मलम/उपचार कसे लावणार आहेत?
  3. त्या वक्त्यांनी बौद्धांचे बुध्दवाणी लोकांपर्यंत पोहोचत नाही, ती कशी पोहोचवावी व काय धोरणे ठरवावीत हे सांगितले का ?
  4. काही भावना  दुखावल्या गेल्याने काहींनी अप्रसन्न होऊन जर गावातल्या गरीब-दुर्बल बौद्धांवर हल्ला झाल्यास तर त्याची जबाबदारी कोणी घ्यावी ?
  5. काही भावना  दुखावल्या गेल्याने काहींनी अप्रसन्न होऊन जर नोकरीत,व्यवसायात, गावात, सोसायटीत बौद्धांना टाळु/हिणवु  लागले तर त्याची जबाबदारी कोणी घ्यावी ?
  6. गरीब, दुबळा व अल्पसंख्याक बौद्ध समाज सबळ  समाजाची निंदा करताना त्याच्याकडे काही सुपरपॉवर आहे का ? आणि जरी ती असली तर, असा दुरुपयोग भीम-बुद्धाला अपेक्षित आहे का?

ह्या प्रश्नांची उत्तरे वक्ता, आयोजक  व बौद्ध समाज यांना द्यावी लागतात, आणि ती कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे नोकरीत,व्यवसायात, गावात, सोसायटीत बौद्धांना स्पष्ट/अस्पष्ट   टाळु/हिणवु  लागले आहेत. याची दखल उच्च सुशिक्षित व प्रतिष्ठित घ्यावीच लागेल. 


 धर्मांतराच्या ६७ वर्षांनंत सर्व बौद्धांना, आता तरी हे समजायला  हवे कि द्वेष-दुर्भावना दिल्याने अशांती वाढते. आणि जिथे बैचेनी व अशांती असते, तिथे शहाणी माणसे जात नाहीत. आणि तिथे काही काळासाठी गेल्यास थांबत नाही. 

जोपर्यंत बुद्ध वाणी सर्व जाती-धर्मापर्यंत पोहोचवण्याठी, कुठली धोरणे, कुठली पद्धत, कुठले वक्ते आपण ठरवायचे  व ते कसे सुधारायचे जो पर्यंत आपल्याला कळत नाही तो पर्यंत आपल्याकडुन देशसेवा व मानवसेवा होणार नाही. अपयश निश्चित आहे.  

भाग पहिला : कटु प्रसंग समाप्त 

भाग दुसरा  : कटु प्रसंगावर उपाय-योजना 

२.१ पहिला प्रसंग- २०२३ भीम जयंतीच्या दिवसासारखे   दुर्दैवी भाषण टाळण्यासाठी उपाय-योजना :
  1. कोणत्याही कार्यक्रमाला वक्त्यांची निवड करण्यापूर्वी त्याचे भाषण, व्यक्तिमत्व, शब्द प्रभुत्व, मुद्द्यांची मांडणी, सामाजिक सलोख्याची जबाबदारी व विचार   ऐकूनच व तपासूनच घ्यावे.
  2. पाली भाषा माणसांना व निर्जीव मूर्तीला समाजात नसल्याने ३०-५० मिनिटे घेतल्याने कोणी प्रसन्न होईल अशी अंधश्रद्धा पसरवण्यापेक्षा हि औपचारिकता ५-१० मिनिटांत संपवावी. 
  3. वक्त्यांना अगोदरच कळवावे कि दोन संप्रदायात वाद-भांडणे होतील असे मुद्दे न मांडलेले बरे. विष पेरुन कोणाच्या भावना दुखवु नये. कारण आगीने आग विझत नाही, ती पाण्यानेच विझते ! हा सनातन(पर्मनंट) धर्म/नियम  आहे. 
  4. प्रबोधन करताना इतर जाती-धर्माचा आदर पुर्वक उल्लेख करावा अन्यथा अबौद्धच नाही तर बौद्ध हि खुप  नाराज होतात. याची कल्पना द्यावी.
  5. शक्य झाल्यास वक्त्यांकडुन त्याच्या प्रवचनाची लेखी प्रत मागवावी. आणि अनुचित मुद्दे काढण्याची मागणीच करावी. 
  6. उदाहरणासाठी लक्षात ठेवावे एक खरा ख्रिश्चन आचार्य, इतरांची निंदा करण्याच्या ऐवजी प्रभू येशुची मैत्री, प्रेम व सद्भावना लोकांपर्यंत पोहोचवतो. ज्याने लोकांचे (ख्रिश्चन व अ-ख्रिश्चन )  प्रभू येशु वरती प्रेम व सद्भावना वाढते.  हे तर बौद्धांनाही जमायला पाहिजे!!

२.१ दुसरा प्रसंग- २०२३ अशोका विजयादशमी च्या दिवशी दुर्दैवी भाषण आणि कार्यक्रमाचे अनियोजन टाळण्यासाठी उपाय-योजना :
  1.  सर्वाना मोबाईल बंद/सायलेंट ठेवायला सांगावा. व `बोलण्यासाठी फोन घेऊन बाहेर जाण्यास सांगावे. 
  2.  पालीतुन होणारा बौद्ध पुजा पाठ हा बुध्द मूर्तीला व माणसांनाही समजत नसल्याने त्याचा अपेक्षित परिणाम होत नाही. म्हणुन तुम्हाला हे दिसले असेल, कि  अधिकांश  बौद्ध समाज सकाळी ११ ची वेळ दिली असताना १२.३० वाजता आला होता. याला अपवाद होते आयोजक व नोकरीतुन निवृत्त झालेली माणसे!
  3. बौद्ध पुजा पाठ घेणारे भंतेजी/बौद्धाचार्य यांना कितीही इच्छा असली तरी, जर ते मुख्य प्रवचनकार नसतील तर, त्यांना ५-१० मिनिटापेक्षा अधिक वेळ घेऊन कार्यक्रमाची रूपरेषा संकटात आणू नये. अशा वेळेस नियोजित अध्यक्षाने जबाबदारीपूर्वक इशाऱ्याने/बेल वाजवुन अनियोजित भाषण थांबवावे. कारण मानसशास्त्रानुसार ५० मिनिटानंतर माणसे कंटाळतात, ६०+ वयाच्या लोकाना लघवीला जावे लागते. तरुण वर्ग कंटाळुन निघुन जातो. आयोजकांना हे अपयश खुप जिव्हारी लागते. 
  4. कार्यक्रमाच्या मुख्य वक्त्याला १०-१५ मिनिटानंतर लगेच संधी द्यावी, कारण स्वतःचे भाषण लक्षात ठेवणे, मुद्देसूद मांडणे व भाषणाचा उत्साह कायम राखणे हे खुप कठीण काम आहे. १-२ तासाने तो वक्ता स्वतःच कंटाळतो व कसे बसे भाषण आवरून निघुन जातो. प्रत्येकाने स्वतःच्या दिवसाचे नियोजन नियोजित वेळ ठरवुन केलेले असते. श्रोते बैचेन  झाले कि वक्ता हि भाषण संपवुन टाकतो. आयोजकांना व जनतेसाठी हे अपयश खुप दुर्दैवी असते. कारण वर्षाच्या  ३६५ दिवसांपैकी बौद्धांकडे २-३ कार्यक्रम असतात.
  5. जर कार्यक्रम ३-४ तासांचा ठेवायचा असेल, तर ६०-७० मिनिटांनी ब्रेक/विश्रांती घ्यावी. अशाने लोकांची मने पुन्हा टवटवीत होतील. 
  6. "फक्त दोनच शब्द बोलतो" असे बोलून माईकचा  ३०-५० ताबा मिनिटे घेणाऱ्या अनियोजित वक्त्यांना थांबवण्याची जबाबदारी हि अध्यक्ष व सूत्रसंचालकांची असते.  ती त्यांनी हिंमत ठेवुन, ठामपणे व प्रेमपूर्वक पार पाडावी. 
  7. प्रवचन जर वेळेत सुरु केले तर, प्रवचन चालु असताना खीरदानाच्या कामाने व्यत्यय येणार नाही. 

मला विश्वास आहे ह्या समस्या व त्यावरील उपाययोजना लक्षात घेऊन नियोजन केले कि, मेहनत घेऊन आयोजन करणाऱ्यांना उच्चतम समाधान, यश, प्रतिष्ठा व सामाजिक कामांना गती मिळेल. तसेच इतर अबौद्ध  समाजासोबत सामाजिक सलोखा व बंधुत्व टिकविण्यास मदत होईल. कार्यक्रम थोडक्यात पण प्रभावी झाल्यावर लोक (खास करून तरुण मंडळी) कार्यक्रमाला येतील. 

माझे विचार व मत सांगताना मी लहान तोंडी मोठा घास घेतल्याचे जाणवत असेल, किंवा'कोणी नाराज झाले असल्यास मी तुमची दोन्ही हात जोडुन माफी मागत आहे. 

आपल्यातला स्नेह व जिव्हाळा वृद्धिंगत व्हावा ह्या अपेक्षेने पात्र पूर्ण करतो. खुप खूप धन्यवाद व जयभीम!!

संबोधन धम्मपथी 
मुलुंड पूर्व , मुंबई ८१. 

https://sambodhandr.blogspot.com/2023/11/blog-post.html