प्रिय सर,
तुमच्या प्रश्नावर/विषयावर मत मांडत आहे.
प्रश्न १: पहिले आर्य सत्य 'दुःख आहे' समजण्यासाठी बौद्ध होण्याची गरज नाही. मग पहिले आर्य सत्य हे नक्की काय सांगते ?
उत्तर: भगवान बुद्धांचे कोणतेही विचार समजण्यासाठी खरेच
बौद्ध होण्याची गरज नसून,
सन्मार्गावर चालण्यासाठी अंर्तमुखी होऊन स्वतःचाच स्वभाव बदलण्याची गरज आहे. ती स्वभाव बदलण्याची पद्धतही बुद्धांनी दिली आहे.
पहिले आर्य सत्य सांगते कि जगात दुःख आहे, म्हणजे जन्म, आजारपण, म्हातारपण, प्रिय माणसाचे/घटनेचे
दुरावणे-अप्रिय माणसाचे/घटनेचे जवळ येणे, मनातील भ्रम/चिंता आणि मृत्यु हे सर्व दुःखाचे प्रकार आहे. पण मनुष्य हे मानतच नाही. हे समजण्यासाठी एक उदाहरण देतो:
जसे एका बेटात सगळे जसे एखाद्या रोगाने(जसे देवीचा व्रणाचा रोग) अनेक पिढ्यांपासून ग्रस्त आहेत व त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीच संबंधच नाही. तेंव्हा त्यांचा असाच भ्रम होतो,कि हा रोग रोग नसून, मानवी जीवनाचाच टप्पा व भाग आहेत, जसे वयात आल्यावर मिशा येणे. बाहेरून एक विद्वान व निरोगी डॉक्टर येतो, तो सर्वाना बघतो व चार वाक्ये म्हणतो
१. अरे तुम्हा सर्वाना तर हा देवीच्या व्रणाचा रोग आहे.
२. ह्या रोगाचे कारण कारण अस्वच्छते मुळे येणारे विषाणु आहेत.
३. ह्या रोगाचे निवारण शक्य आहे.
४. ह्या आठ गोळ्या (आर्य अष्टांगिक मार्ग) खाऊन तुम्ही रोग मुक्त होऊ शकता.
पण त्या बेटावरील लोकांना त्याच्या म्हणण्यावर लक्ष देत नाही. कारण तो रोग म्हणजे जीवनाचाच हिस्सा म्हणून माणसाने तो स्वीकारलेला असतो. म्हणून माणसे विचारतात कि, पहिले आर्य सत्य विशेष असे सांगते?
कारण हे सर्व आम्हाला सर्व आहे, व आम्ही त्यासोबत जगणे शिकलो आहोत.
जसे आपण स्वीकारतो कि खालील गोष्टी/ संकटे मानवी जीवनाचाच भाग आहेत ,
१. कुठलेही वाईट कामे करा पण पकडले जाऊ नका.
२. मग इतरांना लाच देऊन बाहेर पडा, व काहीच न घडल्याचा दिखावा करा
३. विवाहबाह्य संबंध, बलात्कार -हत्या, स्त्री पुरुष असमानता
४. जातीयवाद, भ्रष्टाचारी माणसे, सांप्रदायिक दंगे, जमावाद्वारे हत्या, प्रदुषण
५. पक्षपात, आत्महत्या, घटस्फोट, प्रेमभंग, अकाली मृत्यु , महामारी
६. अनियोजित शहरे, राष्ट्रीय मालमत्तेचे खाजगीकरण, आळशीपणा,
७.
तिरस्कार-चिडचिड,
क्रोध, अज्ञानीपणा, विसरभोळेपणा, मनोविकार, अहंभाव, भीती-शंका, मोह-मुढता (इच्छांचे पारतंत्र्य )
तो बाहेरून आलेला डॉक्टर हे सांगतो अरे हे सर्व जीवनाचा भाग नाहीत, हे रोग आहेत जे कुठल्याही ईश्वराने दिलेले नाहीत. कारण / विषाणु/अविद्या नष्ठ केली कि जीवनात निर्मळ सुख निश्चित आहे.
तो डॉक्टर म्हणतो हे वरील सात गोष्टी/ संकटे तुम्ही जीवनासोबत घेऊन जगत आहात, पण कायमचा सोडवण्याचा प्रयत्न नाही करत. त्या वरून लक्ष हटवण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करता :
१. खेळ खेळणे-पाहणे, टीव्ही-नाटक-चित्रपट-पॉर्न पाहणे
२. विविध वाढदिवस-लग्न-कार्यक्रम-उत्सवात संगीत-नाच-गाणे-पार्टी-कर्मकांड करून इतरांना दाखविणे कि बघा मी-माझे कुटुंब-माझा समाज कसा खुश आहे
३. पुस्तकात -गप्पात -मोबाईल-कॉम्पुटर मध्ये मन गुंतविणे
४. शेवटी दारू-व्यसने-झोपेच्या गोळ्या-आत्महत्या
५. सौन्दर्य प्रसाधनाद्वारे म्हातारपण/आजारपण लपविणे
म्हणून समजून घ्या पहिले आर्य सत्य व बाह्यजगात सुखाचे-दुःखाचे कारणे शोधणे थांबवा. शाश्वत/पर्मनंट सुखासाठी स्वावलंबी-अंतर्मुखी व्हा.
प्रश्न १:
बाबासाहेब आंबेडकरांनी चार आर्य सत्यांवर शंका का
घेतलेली आहे ?
उत्तर:बाबासाहेबांनी कधीही कुठलाही ग्रंथ किंवा मत डोळे झाकून स्वीकारलेले नाही. बुद्धाचेही नाही!
तसे तुम्हीही डोळे झाकून स्वीकारू नका, असे बुद्धानेही सांगितलेलं आहे. उपस्थितअधिकृत बुद्ध वाणी साठी आपल्याला मुळ त्रिपिटक अभ्यासावे लागते, जो गुरु-शिष्य परंपरे द्वारे अनेक भिक्षूंच्या वैयक्तिक समजेतून व आठवणींतुन बनला आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी, त्यांच्या 'बुद्ध व त्यांचा धम्म' ग्रंथांत एकूण चार विषयावर शंका उपस्थित केली आहे व पुढील संशोधनासाठी आपल्याला आवाहन केले आहे. त्यातली दुसरी शंका, आर्य सत्यांबद्दल आहे. एक महत्वाचे म्हणजे एखाद्या विषयावर शंका उपस्थित करणे व तो विषयच नाकारणे यात खूप खूप फरक आहे.
त्यांच्या वरील सांगितलेल्या ग्रंथात, त्यांनी आर्य सत्यांसाठी वेगळा धडा दिलेला नाही
बाबासाहेबांनी शंका उपस्थिक केली आहे, आर्य सत्य नाकारलेले दिसत नाही.
आर्य सत्याच्या मानवकल्याणाबाबत काही प्रश्न मांडले आहेत. जर त्या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळाले तर बाबासाहेबांना आर्य सत्याबद्दल काही हरकत नसावी.
कारण पण, त्याच ग्रंथात त्यांनी अनेक ठिकाणी चार आर्य सत्यांचा उल्लेख धम्म समजावताना केलेला दिसतो.
१. सम्यक मार्गाचे अनुसरण : खंड ४, भाग तिसरा
२. सदाचरणासंबंधी प्रवचन : खंड ४, भाग चौथा
३. का बौद्ध धम्म निराशावादी आहे?
खंड ६, भाग तिसरा
कमीत कमी तीन संदर्भ मला बाबासाहेंबांच्या ग्रंथात दिसल्याने ,बाबासाहेबांनी आर्य सत्य नाकारली हे अजिबात म्हणता येणार नाही.
अजून महत्वाचे कि, ज्या एकूण चार शंका बाबासाहेबांनी मांडल्या आहेत त्या सर्वच्यासर्व शंकाचे उत्तर बाबासाहेबांनी त्याच ग्रंथात दिलेले आहेच . तरीही ते इतिहासतज्ञ असल्याने वाचकांना सजग राहण्यासाठी त्यांनी सर्वच्यासर्व शंकाचे उत्तर आपल्याला पुढे शोधण्याचे आवाहन केले. कारण प्रगती, शोध-प्रक्रिया व यश हे कायमचे नसते.
आपल्या वाचनात हे मिळाले आहे कि, जरी पहिले आर्य सत्य दुःख असले तरी वरील प्रश्न १ च्या उत्तरामध्ये सांगितल्याप्रमाणे बुद्धाने फक्त दुःखच आहे हे सांगून शांत नाही बसले. त्यांनी पुढील तीन आर्य सत्यात सांगितले कि त्याचे निराकरण शक्य आहे व निराकारणाचा खात्रीलायक उपायही सांगितला आहे.
त्यामुळे चार आर्य सत्यांबद्दल मनात शंका ठेवणे हे योग्य नाही.
बाबासाहेंबांनीही त्यांच्या ग्रंथात धम्म समजावताना उद्घृत केलेली व समजावून सांगितलेली आहेत.
संभ्रमात/विवादात पडून मनुष्य जन्म वाया घालवू नये, व्यवस्थितरीत्या वाचन करावे.
मंगल व्हावे !!
संबोधन धम्मपथी