आदि मे कल्याण है, मध्य में कल्याण ।
अन्त में कल्याण है , प्रगती पथ निर्वाण ।।
- आचार्य सत्य नारायण गोयंका
मानवी जीवनात माणसाची निरनिराळी लक्ष जीवनाच्या वेगवेगळ्या टप्यावर असतात. आणि माणसाचे लक्ष सहसा दूर असतें व त्यासाठी निरंतर प्रयत्न करावे लागतात. जो पर्यंत लक्ष भेटत नाही तो पर्यंत सुख-शांती बहुधा मिळत नाही. पण सद्धर्माच्या राजरस्त्याची गोष्ट वेगळी आहे. कारण मनुष्य जसजसा चालायला लागतो तसातसा सुख शांतीचा स्वानुभव प्रत्येक पदोपदी घेत राहतो. जर धर्म खरा असेल तर त्या क्षणी सुख शांती मिळायला हवी. म्रुत्युनंतर मिळणारी शांतीतर तपासता येत नाही, मग ती बाजुला ठेवुया.
सद्धर्माचा रस्त्यात तर फक्त तीनच गोष्टी करायच्या असतात, फक्त तीनच!! शील,समाधि व प्रज्ञा . जसे एखादाप्रवास करताना पहिल्यांदा प्रत्येकाला टीकिट काढावेच लागते व तेव्हाच प्रवासाला सुरुवात करता येते. त्याच प्रमाणे सद्धर्माच्या राजमार्गावर पहिले व सुरुवातीचे पाऊल म्हणजे शील-सदाचाराचा स्वीकार. कुशल काम करणार्या व्यक्ती धम्माच्या राजमार्गावर खुप लवकर प्रगती करतात. अकुशल कर्म करणार्या व्यक्तीस स्वताला शील-सदाचाराचे जीवन स्वीकारावे लागते, पंचशीलाचे काटेकोर पणे करण्याची प्रतिद्न्याच घ्यावी लागते। पण साधक अशी प्रतिज्ञा इतरांना दाखविण्यासाठी नाही, तर स्वताला धम्माच्या मार्गावर काही काळ तरी तपासुन व चालून पाहण्यासाठी घेतो. अकुशल कर्म करीत बैचेन झालेले मन, आचार्यांची माफी मागुन पश्चातापातुन काही (काळ का होइना) मुक्त होऊन, निर्दोष व शांत जीवनासाठी नवी सुरुवात करते. आता मी पांच शील नव्याने घेवून नवीन प्रयत्न करीत आहे. नव्या जोमाने व उत्साहाने ध्यान करण्यास किंवा जीवन जगण्यास सुरुवात करते. ह्या नवीन उत्साह व जोम व अकुशल कर्माबाबत क्षमा मिळाल्यावर शांती मिळते. पंचशील पालन करीत असल्याने आता अकुशल कर्मांपासुन मनुष्य दूर गेलेला असतो. आणि त्यामुळे आता मी वाईट कर्मे करीत नाही हे जाणुन मनातील अनामिक भीतीची जागा आनंद घेतो. असे धर्मात सुरुवातीलाच कल्याण साधले जाते.
पण मनाचा जुना स्वभाव हा सहजा सहजी बदलत नाही. बैचेन व्हायचा व अकुशल कर्म करायचा जुना स्वभाव आपणास नेहमी व्याकुळ करतो, खास करून शील पालन करते वेळी. मनात जसे विचारांचे वादळ नेहमीच सुरु असते. आपण काम एक करतो आणी मनात विचार दुसरा सुरु असतो. अशा वेळी साधकाला धर्माचे पूढील पाउल शिकवितात: समाधि . जसे कधी पाण्यातील माती पाहण्यासाठी पाण्याला शांत होऊ द्यावे लागते, तसेच मनातील विविध अकुशल विचार दूर करण्यासाठी त्याला शांत खूप गरजेचे असते. कारण आपल्या मनाचे ओपरेशन आपल्या मनालाच करायचे असते. त्यामुळे मन जे दिशा दाखविल त्या दिशेकडे दुर्लक्ष करून, आपले लक्ष फक्त आपल्या स्वताच्या शुद्ध व नैसर्गिक श्वासकडे ठेवायला सांगितले जाते (आनापान सति विद्या). नेहमीच विविध दिशेत भटकणार्या मनाला लगाम घालुन स्वताच्या श्वासावर राहण्याचे शिकविले जाते. त्यामुळे विविध प्रिय-अप्रिय आणि वर्तमान व भुतकाळातील घटनांच्यामागे मागे पळणार्या मनाला शांत राहत वर्तमानकाळात म्हणजेच ह्या क्षणाचा परिपूर्ण विचार करण्यासाठी शिकविले जाते. अशाने श्वासाद्वारे केंद्रित झालेले मन खुप मानसिक शांती देते. अशा प्रकारे धर्माचे दुसरे पाउल सुद्धा खूप कल्याणकारी असते.
पण तरी सुद्धा ही शांती कायमची नसते. कारण ध्यान करून उठले कि इतरांशी वागताना जुना क्रोधी, अहंकारी, लोभी व पश्चाताप करणारा स्वभाव कायम असतो. अशा स्वभावाची मुळे अंर्तमानात खोल खूप खोल रुजलेली असतात. त्यामूळे ती दूर करण्यासाठी साधकाला प्रज्ञा शिकविली जाते. प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान, शरीर व मनाच्या क्रियाप्रक्रियांचे प्रत्यक्ष ज्ञान. तेव्हाच साधक मुळ स्वभावाला सामोरे जातो. काय आहे माझा स्वभाव? साधकाला हे कळू लागते कि, कुठले ही अकुशल कर्म करण्यापुर्वी मला मनात लोभ,वासना, ईर्ष्या व मत्सर किंवा क्रोध उत्पन्न करावाच लागतो, त्याशिवाय अकुशल कर्म वाणी किंवा शरीराद्वारे होत नाही. आणि ते अकुशल कर्म केल्यावर इतरांना माझ्यापासून त्रास तर नंतर होतो, पहिल्यांदा मलाच जबरदस्त त्रास होतो. मी अत्यंत व्याकुळ व धडधडत असतो. असे जाणल्यावर नवीन दुष्कर्म होत नाही, व जुन्या दुष्कर्माची सवय/आठवण उफाळुन आली कि मी शरीर व मनाच्या संवेदनांकडे सजगतेने व साक्षीभावाने (तटस्थपणे) व समता ठेवून (ना लोभ जागविता व ना द्वेष/क्रोध जागविता) पाहत जुन्या अकुशल आठवणींचा शरीर व मनावरचा दुष्परिणाम दूर करतो. आता अविचारांच्या आगीला नवीन जळण मिळत नाही, व जुने दुष्कर्मे साक्षी भावाने पाहत दूर होतात. हा शरीर व मनाचा खेळ दर सेकंदाला सुरु होतो व संपतो. हे उत्पन्न व नष्ट होण्याचे ज्ञान साधकाला विपश्याने द्वारे स्वकष्टानेच मिळते. अशा प्रकारे जुने संस्कार जे व्याकुळ बनवितात दूर झाल्याने महान व मंगल शांती मिळते. म्हणुन धर्माचे हे अंतिम पाउल ही खुप कल्याणकारी आहे याची प्रचिती साधकाला येते. कष्ट मात्र त्यालाच घ्यावे लागतात, इतर कोणी माझ्या मनाची सफाई करेल हे केवळ अशक्य आहे.
अशा प्रकारे धर्माचे पाउल (शील-सदाचार ), मधले पाउल (समाधि - कुशल मनाची एकाग्रता) व अंतिम पाऊल प्रज्ञा हे तिन्ही महत्वाचे व कल्याणाकडे नेणारी पाऊले आहेत. हाच तर खरा प्रगतीचा एकमेव राजपथ/राजमार्ग आहे. साधकाने ही पाऊले वाचुन व ऐकूनच समाधान न मानता स्वतः तपासून पहावी, कि खरच असे होते का? तेव्हाच तर विश्वास होईल व त्यानंतर गंभीर रीत्या साधना केल्यावर आपण खरे तर मुक्तीपथ/प्रगतीपथ निर्वाण (कायम स्वरुपी निर्दोष जीवनाचे सुख) आपणास मिळु शकेल.
स्पष्टीकरण : संबोधन धम्मपथी